गणेशोत्सवाची धामधूम संपल्यानंतर अखेर एल्फिन्स्टन पूल पाडण्याचं काम आता हाती घेण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री मुंबई पालिकेचं पथक आणि पोलिसांच्या फौजफाट्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
...म्हणून पुल पाडकाम हाती
अटल सेतू थेट वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी एलिव्हेटेड मार्गासाठी एल्फिन्स्टन पूल पाडावा लागतोय. पश्चिम आणि मध्य रेल्वे लाईनवर असलेला एल्फिन्स्टन पूल 125 वर्षे जूना आहे. हा ब्रिटिशकालीन पूल पाडल्यास दादर पश्चिमेकडील एन. सी. केळकर मार्ग, एस. के. बोले मार्ग, भवानी शंकर रोड, गोखले रोड, रानडे रोड, तसेच दादर पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यांवरील वाहतुकीवर ताण येणार आहे.
advertisement
यापूर्वी पुलाच्या पाडकामासाठी एप्रिलमध्ये पूल बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला होता. मात्र, नागरिकांच्या विरोधामुळे याला स्थगिती मिळाली होती. 'अटल सेतू'वरून आलेल्या वाहनांना विनाअडथळा थेट वरळी आणि तेथून पुढे दक्षिण मुंबई, तसंच वांद्र्याला जाता यावं यासाठी 'एमएमआरडीए'कडून 4.5 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग उभारला जाणार आहे. सध्याच्या पुलाच्या जागी स्थानिक वाहतुकीसाठी पुलाची उभारणी करून, त्यावरून वरळी - शिवडी मार्ग जाणार आहे.
या प्रकल्पात आधी 19 इमारती बाधित होत होत्या. मात्र, एमएमआरडीएने या पुलाचा आराखडा बदलल्यानंतर 2 इमारती बाधित होत आहेत. या प्रकल्पामुळे इतर इमारतींनाही धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.