वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर 3 फेब्रुवारी 2026 रोजी महापौर आणि उप महापौरपदासाठी निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी आज 30 जानेवारी 2026 ला महापौर आणि उप महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.त्यानुसार बहुजन विकास आघाडीकडून महापौर पदासाठी अजीव पाटील प्रफुल्ल साने आणि निषाद चोरघे यांनी तर भाजपकडून महापौर पदासाठी दर्शना त्रिपाठी यांनी अर्ज भरला आहे. तर उप महापौर पदासाठी बविआकडून मार्शल लोपीस, कन्हैया भोईर तर भाजपकडून उप महापौर पदासाठी नारायण मांजरेकर यांच्याकडून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणुक चुरशीच्या होण्याचा अंदाज आहे.
advertisement
वसई–विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत असतानाही भाजपकडून लोटस ऑपरेशनची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वसई विरार महापालिकेतील संख्याबळ पाहता बहुजन विकास आघाडीचे 70 आणि काँग्रेसचा एक असे 71 नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजप एकनाथ शिंदेंच्या आघाडीचे 44 नगरसेवक निवडून आले आहेत.त्यामुळे बविआचे आकडे पाहता ते आघाडीवर आहेत, तर कमी संख्याबळ असूनही भाजप आक्रमक भूमिकेत दिसून येत आहे.त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे.
''आमची रणनिती काय आहे,हे आम्ही 3 फेब्रुवारी रोजी दाखवू.आमच्याकडे 44 नगरसेवक आहेत, आम्हाला फक्त 14 नगरसेवकांची गरज आहे. काहीही होऊ शकते,''असे वक्तव्य करत भाजप आमदार राजन नाईक यांनी लोटस ऑपरेशनचे संकेत दिले आहेत.यावर आता बविआ काय रणनिती आखते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.तसेच या पार्श्वभूमीवर वसई–विरार महापालिकेतील महापौर निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे.
