विरारच्या मनवेलपाडा येथील डिमार्ट मॉलमध्ये रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. ग्राहक खरेदीत व्यस्त असताना एका अज्ञात चोरट्याने एका महिलांच्या बॅगेवर हात साफ केला. ही संपूर्ण घटना मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. या घटनेनंतर पीडित ग्राहकाने विरार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
advertisement
या संदर्भात विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक लालू तुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. तपासाची दिशा ठरवण्यात आली असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
Watch Video :
गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा आणि मॉलमध्ये मोठी गर्दी होत असल्याने अशा चोरीच्या घटना वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. गर्दीचा फायदा घेत काही चोरटे खरेदीदारांना लक्ष्य करत आहेत. डिमार्टसारख्या मोठ्या मॉलमध्येच अशी घटना घडल्याने ग्राहक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पोलिसांचे आवाहन
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी खरेदी करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मौल्यवान वस्तू, रोकड, मोबाईल आणि दागिने अशा वस्तू सांभाळून ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी बाजारपेठा, मॉल आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवण्याचेही संकेत दिले आहेत.