सुपरफास्ट प्रवासाचं स्वप्न साकार!
अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्या प्रमाणे,15 ऑगस्ट 2027 रोजी बुलेट ट्रेनचे पहिले तिकीट विक्रीसाठी उपलब्ध होईल. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशाला ही ऐतिहासिक भेट मिळणार असून हा दिवस भारतीय रेल्वेच्या इतिहासात महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सुमारे 508 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प केवळ वेगवान प्रवासासाठीच नाही तर भारतातील रेल्वे प्रवासाचा संपूर्ण अनुभव बदलणारा ठरणार आहे. कमी वेळेत लांबचा प्रवास, अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे.
advertisement
कसा असेल हा मार्ग?
गुरुवारी नवी दिल्ली येथे झालेल्या कॅबिनेट ब्रीफिंगमध्ये रेल्वेमंत्र्यांनी बुलेट ट्रेनच्या टप्प्याटप्प्याने सुरूवातीबाबत माहिती दिली. सुरुवातीला गुजरातमधील सुरत ते बिलिमोरा हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाईल. त्यानंतर वापी ते सुरत आणि पुढे वापी ते अहमदाबाद हे टप्पे पूर्ण केले जातील. महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आधी ठाणे ते अहमदाबाद हा मार्ग सुरू केला जाईल आणि शेवटी मुंबई ते अहमदाबाद हा संपूर्ण मार्ग सुरु होईल.
यावेळी अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या यशाचाही उल्लेख केला. वंदे भारत गाड्यांमुळे प्रवाशांचा हाय-स्पीड ट्रेनवरील विश्वास वाढल्याचे त्यांनी सांगितले. या यशानंतर रेल्वेकडून वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचीही तयारी आहे.
विशेष म्हणजे कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन जानेवारी 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या गाड्यांमुळे रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना अधिक सुरक्षितता आणि आधुनिक सुविधा मिळणार आहेत.
