मुंबई : जगभरात आज अब्जावधी लोकांना डायबेटिस अर्थात मधुमेहाचा त्रास आहे. दररोज या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामागे बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ताण-तणाव, पूरक आहाराचा अभाव आदी कारणे सांगितली जातात. मात्र, यासोबतच काही महिलांना गर्भधारणा कालावधीतही मधुमेहाचा आजार होतो. त्यामागे नेमकी काय कारणे आहेत, याबाबत जाणून घेऊयात.
डॉ. विनंती पोळ यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, अनेक महिलांना गरोदरपणात मधुमेहाची समस्या दिसते. गर्भधारणेमुळे महिलांच्या कर्बोदकांच्या चयापचयात बदल होतात. गर्भधारणेचा काळ जसजसा पुढे जातो, तसतशी इन्सुलिनच्या स्त्रावात वाढ होते. जेव्हा ही वाढ पुरेशी होत नाही, तेव्हा गरोदरपणात मधुमेह निर्माण होतो.
advertisement
या वाढलेल्या साखरेचे योग्य तऱ्हेने व्यवस्थापन गरजेचे असते. गरोदरपणी होणाऱ्या मधुमेहाला ‘जेस्टेशनल डायबेटीस’ म्हणतात. याचा आई आणि बाळाला धोका असतो. प्रसुतीनंतर हा मधुमेह निघून जातो. पण, वेळीच काळजी घेतली नाही, तर याचे रूपांतर टाइप-2 मधुमेहात होऊ शकते. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
ज्या महिलांना आधीच मधुमेहाचे निदान झाले असते, त्यांना गर्भधारणा झाल्यावर ‘प्रसूतीपूर्व मधुमेह’ म्हणतात. त्यामुळे गर्भधारणेच्या 26-28 आठवड्यात मधुमेहाची चाचणी करायला हवी. गरोदर असल्याचे निदान झाल्यास त्वरीत एक तपासणी करून घ्यावी.
निरलेक्सच्या तव्यावर कोकणी पद्धतीने बनवा झटपट घावणे, चव अशी की पुन्हा बनवाल, सोप्या रेसिपीचा VIDEO
मधुमेहाचे परिणाम काय -
यामुळे गर्भपाताचा धोका वाढतो, वेळेपूर्वीच प्रसूती वेदना, मूत्रमार्गातील जंतुसंसर्ग यांचा धोका वाढतो. या काळात उच्चरक्तदाबाचा धोका वाढतो. फुप्फुस, मूत्रपिंड आणि हृदयविकार होण्याचाही धोका असतो.
प्रसूतीवेळी गुंतागुंत, जास्त रक्तस्राव किंवा जखम चिघळण्याचा धोका असतो
गर्भात जन्मजात व्यंग असण्याचा धोका जास्त असतो. यामुळे फुप्फुसांच्या वाढीला वेळ लागण्याची शक्यता असते. गर्भाशयातच गर्भाचा मृत्यू होण्याचा किंवा वाढ कमी होण्याचा धोका वाढतो. नवजात अर्भकांमध्ये श्वसनाचा त्रास, कावीळ, रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होणे, असे त्रास संभवतात.
मधुमेहाची लक्षणे -
गरोदरपणात मधुमेह होतो, तेव्हा विशेष वेगळी लक्षणे आढळत नाहीत. गरोदरपणातील नेहमीच्या तपासणीवेळीच हा मधुमेह आढळून येतो. जेस्टेशनल डायबेटीस नियंत्रणाबाहेर जातो, तेव्हा महिलेला अति तहान-भूक लागणे, जास्त खाणे, वारंवार लघवी होणे, अशी लक्षणे आढळतात.
मुंबईत महिलांसाठी याठिकाणी मिळतात फॅशनेबल बॅग, दर फक्त 200 रुपयांपासून सुरू, व्हरायटीही अनेक, VIDEO
काय काळजी घ्यावी?
महिलेने गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा व्यवस्थित सल्ला घ्यावा.
व्यंगाचा धोका कमी करण्यासाठी फॉलिक अॅसिड, व्हिटॅमीन बी 12 घ्यावे.
वजन नियंत्रण ठेवावे, योग्य आहार घ्यावा.
गर्भधारणेपूर्वी नियमित व्यायाम करावा.
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवावे.
गर्भधारणेच्या काळात नियमितपणे मधुमेह चाचणी, वैद्यकीय तपासण्या कराव्यात.
पहिल्या 3 महिन्यांत डाऊन सिंड्रोमसाठी नुचल ट्रान्सल्युसेन्सी स्कॅन (NT) चाचणी करावी, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
सूचना - वर दिलेली माहिती ही डॉक्टरांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. लोकल18 याबाबत कुठलाही दावा करत नाही. ही माहिती सामान्य असून वैयक्तिक सल्ला नाही. कुठलाही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.