चंडोला तलाव क्षेत्र, ज्याला ‘मिनी बांगलादेश’ म्हणूनही ओळखले जातं, या भागात असलेलं अवैध बांधकाम पाडण्यासाठीच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. अहमदाबाद महानगरपालिकेने (AMC) या ऑपरेशनसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे, ज्यामध्ये 50 हून अधिक बुलडोजर आणि 3000 पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आले. पहिल्या टप्प्यात 1.5 लाख चौरस मीटर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आलं होतं. आता दुसऱ्या टप्प्यात 2.5 लाख चौरस मीटर जमीन साफ करण्याचे लक्ष्य आहे.
advertisement
पोलीस-प्रशासनाची ही कारवाई चंडोला तलावाच्या आसपासच्या बेकायदेशीर वस्त्या हटवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. येथे मुख्यतः बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित राहत असल्याची माहिती समोर आली होती. पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी सांगितले की, सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 25 राज्य राखीव पोलीस (SRP) पथके देखील तैनात करण्यात आली आहेत. डीसीपी रवी मोहन सैनी यांनी चंडोला तलाव परिसरातील बुलडोजर कारवाईवर माहिती दिली. ते म्हणाले, ‘चंदोला क्षेत्रात बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. राज्य राखीव पोलीस (SRP) च्या 25 कंपन्या, 3000 पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. या क्षेत्रातील सर्व बांधकाम बेकायदेशीर आहेत, त्यामुळे ते हटवले जात आहेत.
यापूर्वीच्या टप्प्यात 4000 हून अधिक बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आली होती आणि आता उर्वरित अतिक्रमण हटवण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. स्थानिक लोकांनी या कारवाईला विरोध केला आहे, परंतु गुजरात उच्च न्यायालयाने याला राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक ठरवून स्थगिती देण्यास नकार दिला होता. हा संपूर्ण भूभाग पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चर्चेत आला होता, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत चंडोला क्षेत्रातून २०७ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे आणि २०० हून अधिक जणांना परत पाठवण्यात आले आहेत.