एअर इंडियाच्या या विमानात असलेल्या 12 केबिन क्रू मेंबर्सपैकी 3 कर्मचारी महाराष्ट्राचे तर तीन जण प्रवासी असे एकूण 6 जण असल्याची माहिती समोर आली आहे. अपर्णा महाडिक, मैथिली पाटील आणि रोशनी राजेंद्र सोनघरे या तीन महिला अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या या विमानात होत्या.
अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. अपर्णा महाडिक या सुनिल तटकरे यांच्या सख्ख्या भाच्याच्या पत्नी आहेत. दुपारी अहमदाबादहून लंडनचं विमान असल्यामुळे अपर्णा महाडिक या आज सकाळीच अहमदाबादला गेल्या होत्या. अपर्णा यांचे पतीही एअर इंडियामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय महादेव पवार, आशा पवार आणि मयुर पाटील हे तीन जणही या विमानामध्ये होते.
advertisement
विजय रुपाणीही विमानात
अहमदाबादहून लंडनला निघालेल्या या विमानात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानीही होते. रुपानी हे त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी लंडनला जात होते. रुपानी यांची पत्नी लंडनमध्ये रहाणाऱ्या त्यांच्या मुलीसोबत आधीच तिथे होती, तर त्यांचा मुलगाही कौटुंबिक कार्यक्रमासाठी अमेरिकेहून लंडनला पोहोचला होता.
कोणत्या देशाचे किती नागरिक?
एअर इंडियाच्या या विमानात असलेल्या 230 प्रवाशांपैकी 169 प्रवासी हे भारतीय होते, तर 53 ब्रिटीश नागरिक, 7 पोर्तुगिज आणि 1 कॅनडाचा नागरिक होता. या विमानातून दोन लहान मुलंही प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळे हे विमान मागच्या 2 दिवसांपासून अहमदाबादमध्येच होते.
दुपारी 1 वाजून 38 मिनिटांच्या सुमारास विमान अहमदाबादमधल्या रहिवासी भागात असलेल्या एका हॉस्पिटलवर जाऊन कोसळले, त्यामुळे रुग्णालयातील 10 ते 12 डॉक्टरही जखमी झाले आहेत. सरकारी रुग्णालयाच्या टीबी विभागावर हे विमान कोसळलं, तिकडे जेवणाची मेस होती.