पंढरपूर : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये पंढरपूरच्या वृद्ध दाम्पत्यालाही त्यांचा जीव गमवावा लागला आहे. महादेव तुकाराम पवार (वय 67) आणि त्यांच्या पत्नी आशा महादेव पवार (वय 55) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. महादेव पवार आणि आशा पवार हे लंडनमध्ये त्यांच्या मुलाला भेटायला निघाले होते. पवार दाम्पत्य हे पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील हातीदचे रहिवासी होते. पवार दाम्पत्याचा एक मुलगा अहमदाबादमध्ये तर दुसरा मुलगा लंडनमध्ये राहतो. पवार दाम्पत्य सांगोल्याहून अहमदाबादला मुलाकडे गेलं होतं, तिथून ते लंडनच्या मुलाकडे निघाले होते. पवार दाम्पत्याचा लंडनमधील मुलगा बेकरीचा व्यवसाय करतो, त्याला भेटण्यासाठी महादेव पवार आणि आशा पवार लंडनला निघाले होते.
advertisement
अहमदाबादहून लंडनला निघालेल्या या विमानात एकूण 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 प्रवासी होते, यातला एक प्रवासी वगळता उरलेल्या 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर विमान ज्या ठिकाणी कोसळलं तिथेही काही जणांना जीव गमवावा लागल्याची माहितीही समोर आली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या 290 पर्यंत असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातल्या 10 जणांनी गमावला जीव
अहमदाबादमधल्या या विमान अपघातामध्ये महाराष्ट्राच्या 10 जणांनी जीव गमावला आहे, यामध्ये 4 जण हे केबिन क्रूचे सदस्य आणि 6 जण प्रवासी होते. मुंबईच्या बदलापूरजवळ राहणारे दीपक पाठक हे सुद्धा या विमानामध्ये क्रू मेंबर म्हणून होते. दीपक पाठक हे मागच्या 11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये काम करत होते. तसंच मुंबईच्या रहिवासी असलेल्या एअर इंडियाच्या कर्मचारी अपर्णा महाडिक यांचंही या अपघातात निधन झालं आहे. क्रू मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या सकाळीच लंडनला जाण्यासाठी मुंबईहून अहमदाबादला गेल्या होत्या.
अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. अपर्णा महाडिक या सुनिल तटकरे यांच्या सख्ख्या भाच्याच्या पत्नी आहेत. अपर्णा यांचे पतीही एअर इंडियामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय मैथिली पाटील, रोशनी सोनघरे या दोन क्रू मेंबर्सनाही जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्राचे 6 प्रवासी
याशिवाय नागपूरमधील क्वेटा कॉलनीत राहणारे मनिष कामदार यांची मुलगी यशा कामदार, त्यांचा मुलगा रुद्र कामदार आणि सासू रक्षा मोढा, पंढरपूरचे महादेव पवार, आशा पवार तसंच मयुर पाटील यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.