नगरीया गावातील २४ वर्षीय धर्मवीर १ डिसेंबर रोजी एका अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्याला वाचवण्यासाठी वडील राम लाल यांनी देव पाण्यात घातले. बरेली इथे रुग्णालयात धर्मवीरवर उपचार सुरू होते. राम लाल यांनी सांगितलं की, त्यांनी मुलाच्या उपचारासाठी आतापर्यंत ३ लाख रुपये टप्प्याटप्प्याने भरले होते. यासाठी त्यांनी घरातील दागिने विकले, नातेवाईकांकडून कर्ज घेतले आणि अखेर राहते घरही गहाण ठेवले. मात्र, १४ दिवसांनंतर धर्मवीरचा मृत्यू झाला.
advertisement
राम लाल यांच्या म्हणण्यानुसार, मुलाच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने आणखी ३ लाख १० हजार रुपयांच्या बिलाची मागणी केली. "माझ्याकडे आता विकायला काहीच उरलं नव्हतं. मी हात जोडले, विनवणी केली, पण रुग्णालयाने पैसे दिल्याशिवाय मृतदेह देण्यास नकार दिला," असा आरोप राम लाल यांनी केला आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मुलाचा मृतदेह घरी नेण्यासाठी कोणताही पर्याय उरला नसल्याने, शेवटी त्यांनी भररस्त्यात लोकांसमोर झोळी पसरवून उभे राहिले. एका बापाने आपल्या मुलाचा मृतदेह घेण्यासाठी चक्क भीक मागितलेली याचा व्हिडीओ सोशल मीडियावप व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहू लोकांचे डोळे पाणावले.
दुसरीकडे, रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "आम्ही कुटुंबाचे पूर्ण बिल माफ केले होते आणि त्यांच्यावर कोणताही दबाव टाकला नव्हता. हा केवळ रुग्णालयाला बदनाम करण्याचा कट आहे," असा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. मात्र, गावकऱ्यांनी राम लाल यांच्या बाजूने साक्ष दिली आहे. "रुग्णालय सातत्याने पैशांसाठी दबाव टाकत होते आणि मुलाच्या मृत्यूनंतर या कुटुंबाला मानसिकदृष्ट्या तोडण्यात आले," असे ग्रामस्थ असगर अली यांनी सांगितले.
गावकरी सांगतात की, संपूर्ण गावाने आपल्या क्षमतेनुसार राम लाल यांना मदत केली. तरीही एका खाजगी रुग्णालयाच्या बिलापोटी एका पित्याला रस्त्यावर भिक मागायला लावणे, ही आपल्या आरोग्य व्यवस्थेतील क्रूरता दर्शवते. राम लाल यांच्यासाठी मुलाचा मृत्यू हा मोठा धक्का होताच, पण मुलाचा मृतदेह मिळवण्यासाठी झालेला हा सार्वजनिक अपमान त्यांच्या आयुष्यातील कधीही न भरणारी जखम ठरली आहे.
