बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी इन्कम टॅक्स विभागाने डिसेंबर २०२५ पासून रॉय यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू केली होती. मागील दोन महिन्यांपासून ही कारवाई सुरू होती. आज इन्कम टॅक्सची टीम रॉय यांच्या कार्यालयात पोहोचली होती. कागदपत्रांची चौकशी सुरू होती. त्यावेळी सीजे रॉय हे आपल्या केबिनमध्ये गेले आणि त्यांनी आपल्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून स्वत: वर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज आल्यामुळे अधिकारी हादरले त्यांनी केबिनकडे धाव घेतली असता रॉय यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत्यू घोषित केलं.
advertisement
काय आहे प्रकरण?
सी.जे. रॉय यांनी २००६ मध्ये बंगळुरू इथं 'कॉन्फिडेंट ग्रुप'ची स्थापना केली होती. रॉय यांची ही कंपनी रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात अत्यंत सक्रिय होती. फक्त बिझनेसच नाहीतर मनोरंजन क्षेत्रातही काम करत होती. काही वर्षांपूर्वी अभिनेता मोहनलाल यांना घेऊन 'कॅसानोव्हा' (२०१२) आणि 'मराक्कर: लायन ऑफ द अरेबियन सी' (२०२१) सारखे मल्याळम सिनेमे बनवले होते. तसंच, 'बिग बॉस कन्नड ११' च्या विजेत्याला ५० लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. तेव्हापासून रॉय हे चर्चेत होते.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. पोलिसांनी ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. ज्या रिव्हॉल्व्हरमधून रॉय यांनी स्वत: वर गोळी झाडली, ती रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतली आहे. या प्रकऱणाचा सगळ्या बाजूने तपास केला जात आहे. या घटनेमुळे बंगळुरू आणि उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
