हरियाणातील रोहतक इथे राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडूचा सराव करताना मृत्यू झाला. लाखन माजरा गावातील मैदानात सराव करत असलेल्या हार्दिक राठी या युवक खेळाडूचा दुर्घटनेत मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दुसऱ्या प्रयत्नात पोल कोसळला
मिळालेल्या माहितीनुसार, बास्केटबॉलचा उत्कृष्ट खेळाडू असलेला हार्दिक, मैदानात वॉर्म अप करण्यासाठी बास्केटबॉलच्या पोलवर लटकून व्यायाम करत होता. तो पहिल्यांदा पोलवर लटकला तेव्हा काही झालं नाही. पण दुसऱ्यांदा तो पोलवर लटकताच, बास्केटबॉलचा जड पोल तुटून त्याच्या छातीवर कोसळला. पोलचे वजन जास्त असल्याने हार्दिकला सावरण्याची संधी मिळाली नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सराव करत असलेल्या इतर खेळाडूंनी धाव घेऊन त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
advertisement
देशाचे प्रतिनिधित्व करण्याची होती तयारी
हार्दिक हा बास्केटबॉलचा एक उत्कृष्ट खेळाडू होता. विशेष म्हणजे, त्याचे टीम इंडियाकडून खेळण्यासाठी निवड झाली होती आणि तो नुकताच इंडिया टीमच्या कॅम्पमधून परतला होता. आता तो आगामी खेळांच्या तयारीसाठी सराव करत होता. हार्दिकचे वडील संदीप राठी यांनी दोन्ही मुलांना बास्केटबॉलच्या सरावासाठी याच मैदानात कोचकडे सोडले होते. आपल्या मुलाकडून देशासाठी मेडल जिंकण्याची वडिलांची मोठी आशा होती. मात्र या दुर्घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेनंतर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी प्रतिक्रिया देत, या प्रकरणाची माहिती घेऊन काहीतरी बोलणार असल्याचे सांगितले. तर, कॅबिनेट मंत्री आणि हरियाणा ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव कृष्ण लाल पंवार यांनी ही घटना दुर्देवी असल्याचे नमूद केले. त्यांनी क्रीडा विभाग आणि शिक्षण विभागाला पत्र लिहून या घटनेची फीडबॅक घेण्याचे आश्वासन दिलं
