चंदीगड: पंजाब पोलिसांचे रूपनगर (रोपड) विभागाचे उपमहानिरीक्षक (DIG) हरचरण सिंह भुल्लर यांना सीबीआयने (CBI) मोठ्या लाचखोरी प्रकरणात अटक केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या घरातून असा प्रचंड खजिना सापडला की सीबीआयलाही नोट मोजण्याची मशीन मागवावी लागली.
advertisement
आरोप आहे की DIG भुल्लर यांनी फतेहगढ साहिब येथील एका स्क्रॅप व्यापाऱ्याकडून 8 लाख रुपयांची लाच मागितली आणि दर महिन्याला “सेवापाणी”च्या नावाखाली ठराविक रक्कम घेण्याची डील केली होती.
तक्रारीनंतर सीबीआयची कारवाई सुरू
11 ऑक्टोबरला स्क्रॅप व्यापारी आकाश बट्टा यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली. त्यात त्यांनी म्हटलं की DIG भुल्लर त्यांना एका खोट्या प्रकरणात फसवण्याची धमकी देत होते आणि त्यांच्या मध्यस्थ कृष्णूच्या माध्यमातून 8 लाख रुपयांची मागणी करत होते. कृष्णू सातत्याने कॉल करून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची “बाकी रक्कम” देण्याची मागणी करत होता.
सीबीआयने पथक तयार करून सेक्टर 21, चंदीगड येथे कृष्णूला 8 लाख रुपये घेताना रंगेहात पकडलं. त्यानंतर सीबीआयने कृष्णू आणि DIG यांच्या दरम्यान कंट्रोल कॉल लावला. ज्यात DIG भुल्लर यांनी पैशांची खात्री करून दोघांना कार्यालयात बोलावलं. त्यानंतर सीबीआयने DIG भुल्लर यांना त्यांच्या कार्यालयातूनच अटक केली.
घरातून करोडोंचा खजिना
CBI च्या छाप्यात DIG भुल्लर यांच्या चंदीगड आणि रोपड येथील ठिकाणांवरून तब्बल 5 कोटी रोख, 1.5 किलो सोने, 22 लक्झरी घड्याळं, Mercedes आणि Audi अशा दोन लक्झरी गाड्यांच्या चाव्या, बेनामी मालमत्तेची कागदपत्रं आणि 40 लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून एक डबल बॅरल बंदूक, पिस्तूल, रिव्हॉल्वर आणि एअरगन देखील सापडल्या. मध्यस्थ कृष्णूच्या घरातूनही 21 लाख रोख जप्त झाले.
सीबीआयने या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एजन्सीने सांगितले की ही अटक भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या कडक मोहिमेचा भाग आहे. दोन्ही आरोपींना 17 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
लाच वसुलीचा स्वतःचा नेटवर्क
सीबीआयच्या सूत्रांनुसार DIG भुल्लर यांनी “सेवापाणी” नावाने स्वतःचं एक वसुली नेटवर्क तयार केलं होतं. त्याद्वारे व्यापाऱ्यांकडून आणि काही पोलीस अधिकाऱ्यांकडून दर महिन्याला ठरलेली रक्कम गोळा केली जात होती. सीबीआय आता या नेटवर्कशी संबंधित इतर व्यक्तींचीही चौकशी करत आहे.