पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी थेट संपर्क
सीआयडी सुरक्षा विभागाचे महानिरीक्षक विष्णुकांत गुप्ता यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांकडून सुरू असलेल्या हेरगिरीवर राजस्थान सीआयडी सतत नजर ठेवून होती. तपासादरम्यान हे समोर आले की, दिल्लीतील नौसेना भवनात डायरेक्टरेट ऑफ डॉकयार्डमध्ये कार्यरत विशाल यादव सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पाकिस्तानी महिला हँडलरशी सातत्याने संपर्कात होता. या महिलेला प्रिया शर्मा हे खोटे नाव दिले गेले होते. तिने विशालला पैशांचे आमिष दाखवून नौसेना भवनातील संवेदनशील व सामरिक महत्वाच्या गोपनीय माहितीची चोरी करून पुरवण्यासाठी प्रवृत्त केले होते.
advertisement
पैशांच्या लालचेतून देशद्रोह
तपासादरम्यान प्राथमिक चौकशीत विशाल यादवबद्दल अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तो ऑनलाइन गेम खेळण्याचा आहारी गेलेला होता आणि आर्थिक अडचणींमुळे त्याने देशाच्या सुरक्षेशी गद्दारी करण्यास सुरुवात केली. तो महिलेला संवेदनशील माहिती देऊन तिच्याकडून क्रिप्टोकरन्सी (USDT) स्वरूपात व थेट बँक खात्यांमध्ये पैसे मिळवत होता.
‘ऑपरेशन सिंदूर’शीही संबंध
विशाल यादवच्या मोबाईलची फॉरेंसिक तपासणी केल्यानंतर आणखी गंभीर माहिती समोर आली आहे. त्याच्या मोबाईलमधून मिळालेल्या चॅट्स आणि दस्तऐवजांद्वारे हे स्पष्ट झाले आहे की, त्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानही नौसेना आणि अन्य संरक्षण विषयक गोपनीय माहिती संबंधित पाक महिला हँडलरला दिली होती. यावरून सिद्ध होते की तो बऱ्याच काळापासून या गुप्तचर रॅकेटचा सक्रिय भाग होता.
संयुक्त चौकशी सुरू
विशाल यादव सध्या जयपूर येथील केंद्रीय चौकशी केंद्रात आहे. जिथे अनेक गुप्तचर संस्था त्याची संयुक्तपणे चौकशी करत आहेत. सुरक्षा यंत्रणा हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की या रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण सहभागी आहेत आणि किती संवेदनशील माहिती लीक झाली आहे.
सामान्य जनतेसाठी इशारा
विशालच्या अटकेमुळे हे पुन्हा सिद्ध झाले आहे की शत्रू देशांच्या गुप्तचर संस्था सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या आत आपल्या जाळ्याचा विस्तार करत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी जनतेला आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा कृती आढळल्यास तात्काळ प्रशासनास माहिती द्यावी.