भोपाळ: मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात खोकल्याच्या सिरपचे सेवन केल्यानंतर अनेक मुलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात चौकशी सुरू असताना प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात डॉ. प्रवीण सोनी यांना अटक करण्यात आली आहे. कोल्ड्रिफ (Coldrif) या खोकल्याच्या सिरपमुळे 14 मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. हे औषध डॉ. सोनी यांनी बेकायदेशीरपणे लिहून दिल्याचे समोर आले आहे.
advertisement
या प्रकरणात श्रीसन फार्मास्युटिकल्स आणि डॉ. सोनी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 276, 105 आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा कलम 27A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासात धक्कादायक माहिती समोर
जिल्हाधिकारी हरेंद्र नारायण यांनी सांगितले की- प्राथमिक चौकशीत खोकल्याच्या सिरपबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आम्ही कठोर कायदेशीर कारवाई करत आहोत. प्रयोगशाळेतील तपासणीत असे आढळले आहे की या सिरपमधील एका घटकाचे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, पण ते तब्बल 48.6 टक्के आढळले आहे. एवढ्या जास्त प्रमाणामुळे हे औषध केवळ मुलांसाठीच नव्हे तर प्रौढांसाठीही घातक ठरले असते.
ते पुढे म्हणाले, मुलांच्या प्रकृतीत झपाट्याने बिघाड झाल्यामुळे डॉक्टर चिंतित झाले. मुलांचे मूत्रपिंड (किडनी) अतिशय वेगाने निकामी झाले. चार मुलांची रेनल बायोप्सी करण्यात आली आणि त्यात अत्यंत गंभीर नुकसान आढळले. औषधाचे नमुने तपासल्यानंतर समजले की त्यात असलेल्या विषारी घटकाच्या प्रमाणामुळेच हे नुकसान आणि मृत्यू झाले.
नारायण यांनी पुढे सांगितले की, मृतदेहांच्या शवविच्छेदनातून काही नवीन निष्कर्ष मिळण्याची शक्यता नाही, कारण मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. मुलांना कोणती औषधे दिली गेली आणि मृत्यूचे कारण काय आहे, हे आम्हाला माहीत आहे. त्या औषधांमधील घटकांचे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होते, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
या घटनेनंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटले आहे की, छिंदवाड्यात ज्या कुटुंबांनी आपले मूल गमावले आहे, त्यांना सरकारने प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी. त्यांनी सरकारकडून अधिक जबाबदार आणि मानवी दृष्टिकोनाची मागणी केली आहे.
दोन राज्यांतील 18 बालमृत्यू
या प्रकरणात आतापर्यंत 18 मुलांचे मृत्यू झाले आहेत. त्यापैकी 14 मृत्यू मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात, तर राजस्थानातील सीकर जिल्ह्यात 1, भरतपूरमध्ये 2 आणि चुरू जिल्ह्यात 1 असा एकूण आकडा आहे. ही घटना संपूर्ण देशभरात खळबळ उडवणारी ठरली असून, औषधांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.