राजधानी एक्प्रेसमधून कुंभमेळ्याहून परतणाऱ्या या कुटुंबासोबत ट्रेन आणि कोच स्टाफने अत्यंत अमानुष कृत्य केलं. या कुटुंबियांनी दिल्लीला जाण्यासाठी अयोध्या एक्स्प्रेसचं तिकीट बुकिंग केलं होतं. परंतु ही ट्रेन रद्द झाली. त्यामुळे त्यांनी राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास केला. त्यावेळी ट्रेनमध्ये तिकीट चेकिंग स्टाफने त्यांच्याकडे तिकीटाचा खर्च आणि दंडासह आणखी पैसे मागितले. ते देण्यास कुटुंबियांनी नकार देताच टीटी स्टाफने त्यांना थेट मारहाण करायला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, टीटी स्टाफने गरोदर आणि वृद्ध महिलांनाही सोडलं नाही. त्यांना अक्षरश: केस पकडून फरपटत नेऊन मारलं. ट्रेन बरेलीमध्ये पोहोचताच पीडित कुटुंबानं जीआरपीकडे धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या 2 महिलांसह तिघांची स्थिती गंभीर आहे. पोलिसांनी सर्व कुटुंबियांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय.
advertisement
दिब्रुगडहून नवी दिल्लीला जाणाऱ्या 20505 राजधानी एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. दिल्लीच्या छतरपूर भागात राहणारे भारत भूषण हे 15 फेब्रुवारीला पत्नी, 2 मुलं, 2 सुना, मुली आणि आपल्या वृद्ध आईसोबत कुंभमेळ्यात स्नान करायला गेले होते. ते सुरळीत पार पडलं आणि या अत्यंत प्रसन्न वातावरणातून सर्वजण बुधवारी सकाळी प्रयागराजहून लखनऊला आले. त्यांना अयोध्या एक्स्प्रेसनं दिल्लीला जायचं होतं. परंतु ही ट्रेन रद्द झाली. मग भारत भूषण आणि त्यांचे कुटुंबीय राजधानी एक्स्प्रेसमधून दिल्लीला निघाले.
राजधानी एक्स्प्रेस लखनऊहून बरेली आणि मुरादाबादहून दिल्लीत दाखल होते. या एक्स्प्रेसमध्ये टीटी स्टाफ मेंबर आले. भारत भूषण यांनी त्यांना आपल्या पूर्ण कुटुबियांचं तिकीट काढण्याची विनंती केली. तसंच ते दंड भरण्यासदेखील तयार होते. त्यावर टीटी स्टाफनी भारत भूषण यांना दंडासह प्रति व्यक्ती तब्बल साडेसात हजार रुपये खर्च सांगितला. त्यावर भारत भूषण आणि त्यांचे कुटुंबीय म्हणाले की, 'तुम्ही तिकीटाचे, दंडाचे पैसे आमच्याकडून घ्या, परंतु आम्ही कोणत्याही प्रकारची लाच देणार नाही.' यावर टीटी स्टाफ भडकले. त्यांनी सरळ भारत भूषण यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यांचे कुटुंबीय जेव्हा आरडाओरडा करायला लागले, तेव्हा टीटी स्टाफ महिलांनाही फरपटत न्यायला लागले. दरम्यान, पीडित कुटुंबानं 'आम्हाला न्याय द्या', अशी मागणी सरकारकडे केली आहे.