ही घटना किश्तवाडच्या वरच्या डोंगराळ आणि दाट जंगल क्षेत्रातील सोनार परिसरात घडली. येथे लष्कराच्या व्हाईट नाइट कोरकडून दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन त्राशी-1’ सुरू आहे. या मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी जवानांची अचानक चकमक उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. लष्कराने 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले होते, मात्र अडचणीत आल्यावर दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. या स्फोटात 7 जवान जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असण्याची शक्यता आहे.
advertisement
सध्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच असून, संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात येत आहे. ड्रोनच्या मदतीने हवाई नजर ठेवण्यात येत असून, स्निफर डॉग्स (शोधी कुत्रे) देखील या कारवाईत सहभागी करण्यात आले आहेत.
या संयुक्त कारवाईत जम्मू–काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि CRPF सक्रियपणे सहभागी असून, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क असून, पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
