अयोध्या - देशातील कोट्यवधी भारतीयांसाठी आजचा दिवस खूपच ऐतिहासिक आहे. कारण, आजच्याच दिवशी 5 वर्षांपूर्वी 9 नोव्हेंबर 2019 रोजी राम मंदिराच्या बाजूने सुर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. आज 5 वर्षांमध्ये अयोध्येत अनेक बदल झाल्याचे दिसून येत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 500 वर्षांचा संकल्प पूर्ण झाला आणि राम जन्मभूमिवर राम मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण झाले. यासोबतच अयोध्येतील 37 मंदिरांचे कामही केले जात आहे.
advertisement
विश्व हिंदू परिषदेचे विभागीय मीडिया प्रभारी शरद शर्मा यांनी सांगितले की, 9 नोव्हेंबर 2019 रोजी मंदिराच्या बाजूने निर्णय आला. आमच्यासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. आज मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आहे. या 5 वर्षांत अयोध्येचे चित्रही बदलले. विमानतळ बांधले गेले आणि रस्त्यांचे रुंदीकरणही केले गेले.
इतकेच नव्हे तर 5 वर्षात अयोध्येत राम भक्तांसाठी अनेक सुविधा करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयानंतर अयोध्येत अभूतपूर्व बदल दिसत आहे. विशेष म्हणजे याठिकाणी आता अत्याधुनिक सुविधांनी युक्त असेल महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट तयार करण्यात आले. तसेच अयोध्या धाम रेल्वे स्टेशनसोबत अयोध्या धाम बस स्टेशनसुद्धा तयार करण्यात आले आहे.
मागील 5 वर्षात अयोध्येतील रस्तेही चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आले आहे. यामध्ये धर्मपथ, राम पथ तसेच राम जन्मभूमि पथचा समावेश आहे. या रस्त्यावरील रामायणकालीन दृश्य राम भक्तांना मोहित करतात. राम मंदिरामुळे अयोध्येला नवी ओळख मिळत असल्याचे अयोध्येच्या संतांचे म्हणणे आहे.
5 वर्षांपूर्वी आला होता ऐतिहासिक निर्णय -
500 वर्षांच्या प्रचंड मोठ्या संघर्षानंतर आणि 70 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर 9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला होता. आज या ऐतिहासिक निर्णयाला 5 वर्षे पूर्ण झाले आहेत. यामध्ये याच वर्षी 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य राम मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. यानंतर देशभरातील तसेच जगभरातील रामभक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहेत. आतापर्यंत 3 कोटी भाविकांनी आपल्या रामललाचे दर्शन घेतल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.