२३ नोव्हेंबर रोजी, अजाक्सचे (अनुसूचित जाती आणि जमाती कर्मचारी संघ) प्रांतीय अधिवेशन आंबेडकर मैदान, तुलसीनगर येथे आयोजित करण्यात आले होते. सनदी अधिकारी संतोष वर्मा यांनी त्याच कार्यक्रमात आरक्षणाविषयी रोखठोक मते मांडली. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. दुसरीकडे ब्राह्मण समाजाने आंदोलनाचा इशारा दिला असून सनदी अधिकारी वर्मा यांनी आमच्या मुलींचा अपमान केल्याचे म्हटले आहे.
advertisement
उच्चवर्णीय समुदायाचा अपमान, नियमानुसार कारवाई व्हावी-सुधीर नायक
मंत्रालय सेवा अधिकारी-कर्मचारी संघाचे अध्यक्ष अभियंता सुधीर नायक यांनी आयएएस वर्मा यांच्यावर आगपाखड केली आहे. वर्मा यांचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आणि उच्चवर्णीय समुदायाचा अपमान करणारे आहे, असे म्हटले. तसेच आयएएस आचार नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. लग्न ही खासगी गोष्ट आहे. आरक्षणाला लग्नाशी जोडणे हे अनुचित आहे, असे नायक म्हणाले.
लग्नाचा आरक्षणाशी काही संबंध नाही-सुधीर नायक
समाजात मोठ्या प्रमाणात आंतरजातीय आणि विविध जाती धर्मांमध्ये विवाह होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सविता आंबेडकरांशी लग्न केले. रामविलास पासवान यांनी रीना शर्माशी लग्न केले, अशी उदाहरणे देऊन आरक्षणाच्या बाजूने ठोस युक्तिवादांचा अभाव असताना अशी विधाने केली जात आहेत, अशा शब्दात त्यांनी वर्मा यांना लक्ष्य केले.
नोकरीतील समस्यांवर चर्चा करायची सोडून इतर चर्चा कसल्या करता?
अजाक्स ही अधिकारी कर्मचाऱ्यांची संघटना आहे. तिथे नोकरीतील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. वर्मा यांच्यासारखा व्यक्ती अशा संघटनेचा अध्यक्ष असू शकत नाही. त्यांच्या वक्तव्याने दोन समाजांमधील दरी वाढू शकते, असे नायक म्हणाले.
अखिल भारतीय ब्राह्मण समाज आंदोलन करणार
अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचे प्रदेशाध्यक्ष पुष्पेंद्र मिश्रा यांनी आयएएस वर्मा यांच्याविरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगितले. वर्मा यांचे विधान अखिल भारतीय सेवेच्या आचारसंहितेविरुद्ध आहे तसेच ब्राह्मण समाजाची थट्टा करणारे आहे. त्यांच्या विधानामुळे समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असून त्यांच्याविरोधात आम्ही आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले.
भाजप सरकारच्या नेतृत्वात लाडकी लक्ष्मी, लाडकी बहीण योजना चालवली जाते. पंतप्रधान 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहीम चालवतात, त्या सरकारमध्ये, एक अखिल भारतीय सेवा अधिकारी असे वक्तव्य करीत असेल तर ते उचित नाही, असे पुष्पेंद्र मिश्रा म्हणाले.
