नाशिक: भारतीय वायुदलाला तेजस मार्क-1A लढाऊ विमानांची पुरवठा प्रक्रिया वेगवान करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने मोठं पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रातील नाशिक येथे तिसऱ्या उत्पादन लाईनचा शुभारंभ करण्यात आला असून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या सुविधेचे औपचारिक उद्घाटन केले.
advertisement
नाशिकच्या ओझर परिसरातील या अत्याधुनिक उत्पादन केंद्रात तयार झालेले पहिले लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) शुक्रवारी यशस्वीरीत्या आपले पहिले उड्डाण चाचणी पूर्ण केली. या क्षणाने भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
2032-33 पर्यंत 180 तेजस विमानांची पूर्तता
HAL च्या या नवीन प्रॉडक्शन लाईनमुळे भारतीय वायुदलाला 2032-33 पर्यंत एकूण 180 तेजस विमानं वेळेत पुरवण्यास मोठी मदत मिळणार आहे. सध्या या युनिटमध्ये 8 फाइटर जेट्सचं उत्पादन सुरू आहे आणि भविष्यात ही क्षमता 10 जेट्सपर्यंत वाढवण्याची योजना आहे.
अमेरिकेकडून इंजिन पुरवठा सुरू
HAL ला सप्टेंबर महिन्यात अमेरिकेकडून या विमानासाठी चौथं GE F404 इंजिन प्राप्त झालं आहे. या फाइटर जेटचं एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याच्या पंखांवर एकूण 9 ठिकाणी क्षेपणास्त्र बसवता येतात. या विमानात अस्त्र, ASRAAM आणि ब्रह्मोससारख्या अत्याधुनिक शस्त्र प्रणालींचं एकत्रीकरण करण्यात येत आहे.
प्रत्येक तेजसची किंमत सुमारे 600 कोटी
रिपोर्टनुसार प्रत्येक तेजस मार्क-1A लढाऊ विमानाची सरासरी किंमत सुमारे 600 कोटी आहे. त्याचा वेग तब्बल 2,205 किमी प्रति तास आहे. म्हणजेच ध्वनीच्या वेगाच्या जवळपास दुप्पट. यामुळे हे विमान केवळ वेगवानच नव्हे तर हवाई लढाईत अत्यंत चपळ आणि प्रभावी ठरते.
500 हून अधिक भारतीय कंपन्यांचा सहभाग
या विमानाच्या निर्मितीत देशातील 500 पेक्षा अधिक स्वदेशी कंपन्यांचा सहभाग आहे. त्यामुळे याला ‘स्वदेशी तेजस’ म्हणून गौरवाने ओळखले जाते. विमानाने पहिली उड्डाण चाचणी पूर्ण केल्यानंतर त्याला वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला. जो HAL साठी एक अभिमानाचा क्षण होता.
आधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज
तेजस मार्क-1A हे सिंगल इंजिन लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टचे अॅडव्हान्स वर्जन आहे. हे चौथ्या पिढीचे हलके लढाऊ विमान असून कमी वजनात अधिक वेग आणि चपळता यामुळे हे डॉगफाइट आणि मल्टी-रोल मिशनसाठी आदर्श आहे. यात अपग्रेडेड एव्हियॉनिक्स, आधुनिक रडार सिस्टम, स्वसंरक्षण कवच आणि कंट्रोल अॅक्च्युएटर सिस्टीम्स बसवण्यात आल्या आहेत. यातील 65% पेक्षा जास्त उपकरणे भारतातच तयार करण्यात आली आहेत.
62,370 कोटींचा नवा करार
केंद्र सरकारने 19 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय वायुदलाला 97 नवीन तेजस फाइटर जेट्स खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. यानंतर 25 सप्टेंबरला संरक्षण मंत्रालयाने HAL सोबत 62,370 कोटींचा करार केला. या नव्या उत्पादन लाईनमुळे या विमानांचा पुरवठा वेळेत आणि मोठ्या प्रमाणावर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तान सीमेवर तैनातीची योजना
या नव्या तेजस मार्क-1A लढाऊ विमानांना राजस्थानमधील बीकानेरच्या नाल एअरबेसवर म्हणजेच पाकिस्तान सीमेच्या जवळ तैनात करण्याची योजना आहे. संरक्षण मंत्रालयानुसार, या विमानांमध्ये स्वयंचलित सुरक्षा प्रणाली (Self Protection System) आणि प्रगत नियंत्रण यंत्रणा (Control Actuators) असतील.
मिग-21चा उत्तराधिकारी
तेजस मार्क-1A हे भारतीय वायुदलातील जुने मिग-21 विमानांचे उत्तराधिकारी (Replacement) ठरणार आहे. मिग-21 ला 26 सप्टेंबर 2025 रोजी सेवानिवृत्ती देण्यात आली, ज्याने 62 वर्षांच्या सेवाकाळात 1971 चं युद्ध, कारगिल आणि अनेक मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मोदींची तेजसमध्ये ऐतिहासिक उड्डाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 नोव्हेंबर 2022 रोजी बेंगळुरूमध्ये तेजस फाइटर जेटमध्ये उड्डाण केले होते. हा प्रसंग ऐतिहासिक ठरला, कारण फाइटर प्लेनमध्ये उड्डाण करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. उड्डाणापूर्वी त्यांनी HAL च्या बेंगळुरू केंद्राला भेट देऊन उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला होता.
तेजस मार्क-1A हे केवळ भारताच्या संरक्षण क्षमतेचा नवा अध्याय नाही, तर ‘आत्मनिर्भर भारत’च्या आकाशात झेपावलेलं प्रतीक आहे. स्वदेशी तंत्रज्ञान, आधुनिक डिझाइन आणि प्रगत क्षेपणास्त्र प्रणालींनी सज्ज असलेलं हे विमान भारतीय वायुदलाला नव्या युगात प्रवेश देणारं ‘सुपर तेजस’ ठरत आहे.
भुकेल्या माणसासारखी प्रतिक्षा- एअर चीफ मार्शल
भारतीय वायुदलाने या वितरणातील विलंबावर अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते की- आम्ही LCA MK1-A ची आतुरतेने वाट पाहत आहोत. ही प्रतिक्षा जणू भुकेल्या माणसाने अन्नासाठी वाट पाहण्यासारखी आहे.