मिळालेल्या माहितीनुसार कोलकाताहून श्रीनगरकडे निघालेल्या इंडिगोच्या 6E-6961 या विमानातील प्रवाशांना बुधवारी एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. 36000 फूट उंचावर विमानाचं उड्डाण सुरू असताना अचानक विमानाच्या इंधन टाकीतून गळती सुरू झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तातडीने मेडे मेडे मेडे असा कॉल देत अवघ्या 4 मिनिटांत विमानाचं वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.
advertisement
१६६ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले
वाराणसी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विमानामध्ये असलेले सर्व १६६ प्रवासी आणि क्रू मेंबर्सला (कर्मचारी) सुखरूप बाहेर काढण्यात आले. सध्या विमानतळ अधिकारी या घटनेची कसून चौकशी करत आहेत. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, वाराणसी विमानतळावरचे कामकाज पुन्हा सामान्यपणे सुरू झाले आहे. या घटनेमुळे मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पायलटने दाखवली समयसूचकता
इंडिगोच्या या विमानाचे पायलट गोमती झोनकडून मिळालेल्या माहितीनंतर तातडीने सतर्क झाले. त्यांना इंधन गळतीची माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वाराणसी विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला. तातडीने इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. एटीसीने परवानगी देताच, सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी विमानाला सुरक्षितपणे रनवेवर उतरवण्यात आले.
विमानाची तातडीने तपासणी सुरू
विमान सुरक्षित उतरल्यानंतर तातडीने तांत्रिक पथकाने विमानाची तपासणी आणि दुरुस्तीचे काम सुरू केले. पर्यायी विमानाची व्यवस्था होईपर्यंत सर्व प्रवाशांना एरायव्हल एरियामध्ये सुरक्षित बसवण्यात आले. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाची दुरुस्ती झाल्यावर ते आपल्या पुढील गंतव्यस्थानाकडे (श्रीनगर) रवाना होईल. प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय होती.
इंडिगोच्या विमानात बिघाडाची दुसरी घटना
इंडिगोच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी, १० ऑक्टोबर रोजी इंडिगोच्याच ६ई-७२५३ या विमानाचे उड्डाण सुरू असताना पुढील काच (Front Glass) तडकली होती. हे विमान ७६ प्रवाशांना घेऊन मदुराईहून चेन्नईला जात होते. रात्री ११ वाजून १२ मिनिटांनी लँडिंगच्या वेळी पायलटला ही बाब लक्षात आली. त्यांनी चेन्नई डोमेस्टिक एअरपोर्टच्या एटीसीला माहिती देऊन इमर्जन्सी लँडिंगची परवानगी घेतली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले होते.
