माफी मागितली, पण दिलासा नाही
परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे आणि डीजीसीएने कडक भूमिका घेतल्याचे पाहून इंडिगोने अखेर एक अधिकृत निवेदन जारी केले. कंपनीने मागील दोन दिवसांत नेटवर्क आणि कामकाजात आलेल्या मोठ्या विस्कळीतपणाबद्दल प्रवाशांची माफी मागितली आहे आणि लवकरच सर्व कामकाज पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी इंडिगोची टीम डीजीसीए, एअरपोर्ट ऑपरेटर आणि अन्य संस्थांसोबत समन्वय साधून काम करत आहे. मात्र, या गोंधळात प्रवाशांना सतत त्यांच्या फ्लाईटची स्थिती तपासत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
दररोज सुमारे ३.८ लाख प्रवाशांना सेवा देणाऱ्या इंडिगोला मागील काही दिवसांपासून गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. देशातील सर्वात मोठी एअरलाइन असूनही, आकडेवारी धक्कादायक आहे. केवळ नोव्हेंबर महिन्यातच या एअरलाइनला तब्बल १,२३२ उड्डाणे रद्द करावी लागली होती, तर शेकडो विमानांना विलंब झाला. डीजीसीएने याबद्दल इंडिगोला फैलावर घेतले होते. इंडिगोने स्टाफची कमतरता, एटीसीमध्ये आलेला बिघाड आणि विमानतळांवरील निर्बंध ही प्रमुख कारणे सांगितली. यावर डीजीसीएने कंपनीला अधिक क्रूची भरती करण्याची आणि कामकाजात सुधारणा करण्याची सक्त ताकीद दिली आहे.
सोशल मीडियावर प्रवाशांचा रोष
इतक्या मोठ्या प्रमाणावर विमाने रद्द झाल्यामुळे हजारो प्रवाशांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी लांबच लांब रांगांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत कंपनीच्या कार्यप्रणालीवर थेट प्रश्नचिन्ह उभे केले. प्रवाशांनी तिकीट परतावा मिळण्यात होणारा विलंब आणि वेळेवर माहिती न मिळाल्याच्या तक्रारींचा पाऊस पाडला. दुसरीकडे, इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्ट यांनी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यासाठी खराब हवामान, तांत्रिक त्रुटी आणि नवीन 'FDTL' नियमांचा परिणाम यांसारख्या अनेक कारणांचा उल्लेख केला.
संकटातून बाहेर पडण्यासाठी युद्धपातळीवर काम
इंडिगोने सध्याच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी 'युद्धपातळीवर' काम सुरू केल्याचा दावा केला आहे. डीजीसीएच्या सूचनांचे पालन केले जाईल आणि कर्मचारी तसेच व्यवस्थापनाच्या कमतरतेच्या समस्या लवकरच सोडवल्या जातील, असे कंपनीने सांगितले आहे. मात्र, सध्याच्या अस्थिर परिस्थितीत प्रवाशांना पुन्हा एकदा आपल्या फ्लाईटची स्थिती सतत तपासावी आणि वेळेआधीच विमानतळावर पोहोचावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
