बेंगळुरू: “माण्याच्या वडिलांशी माझ्या वडिलांची जुनी मैत्री होती,” विवेकानंद धोदामणी बोलताना गहिवरतो. पंधरा दिवस उलटूनही त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे आणि तो म्हणजे, जात एवढी मोठी कशी ठरली की एका बापाने स्वतःच्या गर्भवती मुलीचा जीव घेतला?
advertisement
22 वर्षीय दलित तरुण विवेकानंद आणि 20 वर्षीय माण्या यांचे प्रेम लग्नापर्यंत पोहोचले आणि तिथेच सगळं बदललं. माण्याचे कुटुंब लिंगायत समाजातील. मैत्री चालली, पण लग्न स्वीकारलं गेलं नाही. “माझं स्वप्न होतं की कधीतरी माझं मूल माण्याच्या वडिलांसोबत खेळेल. पण जातीमुळे असा शेवट होईल, असं कधी वाटलं नव्हतं,” विवेकानंद म्हणतो.
कर्नाटक हादरलं
कर्नाटकमध्ये जातीय हिंसा, अगदी ‘ऑनर किलिंग’ नवीन नाही. पण माण्याच्या हत्येची पार्श्वभूमी आणि क्रूरता राज्याला हादरवणारी ठरली. दलित संघटनांनी तीव्र आंदोलन केलं, तर अनेक लिंगायत संघटनांनीही या घटनेचा निषेध करत ‘प्रायश्चित्त दिन’ पाळला.
या प्रकरणात माण्याचे वडील प्रकाशगौडा पाटील आणि नातेवाईक वीरणगौडा पाटील व अरुणगौडा पाटील यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून SC/ST (अत्याचार प्रतिबंध) कायद्या अंतर्गतही आरोप ठेवण्यात आले आहेत.
सरकारची तातडीची पावले
4 जानेवारी रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची आणि खासगी सरकारी वकील नेमण्याची घोषणा केली. खटला लवकर निकाली निघावा, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ‘ऑनर किलिंग’ रोखण्यासाठी स्वतंत्र कायद्यावर चर्चा करण्याचाही संकेत दिला.
गावात तणाव, पोलिसांचा बंदोबस्त
विवेकानंद आणि माण्या दोघेही धारवाड जिल्ह्यातील इनाम वीरापूर गावचे. आता गावात जातीय तणाव वाढू नये म्हणून प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
धारवाडचे एसपी गुंजन आर्या यांनी सांगितलं की गावात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून त्यांचे थेट पोलीस ठाण्यातून निरीक्षण सुरू आहे. “विवेकानंद आणि त्यांच्या कुटुंबाला चोवीस तास सुरक्षा देण्यात आली आहे. गावकऱ्यांसोबत शांतता बैठक घेतली असून त्यांनी सहकार्याचं आश्वासन दिलं आहे. एका स्थानिक धर्मगुरूंशीही संवाद साधला आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रेमाची सुरुवात, विरोधाची ठिणगी
विवेकानंद अंतिम वर्षाचा बीए विद्यार्थी. तीन वर्षांपूर्वी, माण्या प्री-युनिव्हर्सिटीत शिकत असताना त्यांची ओळख प्रेमात बदलली. इनाम वीरापूर हे अवघ्या शंभर घरांचं गाव. सुमारे 60% लिंगायत, 25% ST (तलवार समाज) आणि केवळ सहा घरं दलित मडिगा समाजाची, विवेकानंद त्याच समाजातील.
“लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. गावात कधी उघड जातीय भेदभाव जाणवला नव्हता,” तो सांगतो. प्रेम फुललं, प्रस्ताव ठेवला, माण्याने होकार दिला. मात्र गावात भेटणं शक्य नव्हतं. गुपचूप भेटी सुरू राहिल्या.
लग्न, आणि तिथून सगळं बिघडलं
एक वर्षापूर्वी माण्याच्या वडिलांना संबंध कळले. कडक निर्बंध आले. “आम्हाला लगेच लग्न करायचं नव्हतं. दोघंही शिकत होतो. पण तिच्या घरच्यांनी लग्नाची घाई सुरू केली आणि तिच्यावर मानसिक छळ वाढला,” विवेकानंद सांगतो.
दोघांनी घरातून पळ काढला, मंदिरात लग्न केलं आणि नोंदणीही केली. पोलिसांसमोर हजर राहून आम्ही आमच्या इच्छेने लग्न केल्याचं सांगितलं. “तेव्हा देखील माण्याच्या वडिलांनी धमकी दिली. पण मला वाटलं रागाच्या भरात बोलत असतील. वेळ गेल्यावर स्वीकारतील,” विवेकानंद म्हणतो.
थोडे सुखाचे दिवस
लग्नानंतर गावाने विवेकानंदच्या कुटुंबाशी संबंध तोडले. दोघं हावेरी येथे नातेवाइकांकडे राहायला गेले. विवेकानंदने एका दुकानात काम सुरू केलं.
“तेच आमचे खरं सुखाचे दिवस होते. माण्या खूप आनंदी होती,” तो सांगतो. ती गर्भवती राहिल्यावर त्यांनी तिच्या कुटुंबाला कळवलं, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. “मुल जन्मल्यावर तरी राग कमी होईल, असं वाटलं,” तो म्हणतो.
शेवटचा दिवस
डॉक्टरांच्या तपासणीसाठी दोघं दर महिन्याला गावात येत. 21 डिसेंबरला ते आले होते, कारण रुग्णालयाने पती म्हणून विवेकानंदचं नाव नोंदवण्यास सांगितलं होतं. पुढच्या दिवशी विवेकानंदची रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा होती.
माण्या विवेकानंदच्या पालकांच्या घरी होती, तेव्हा तिचे वडील आणि नातेवाईक तिथे घुसले. “संध्याकाळी पाच वाजता मी घरी नव्हतो. परत आलो तेव्हा माण्यावर, माझ्या आई-वडिलांवर हल्ला सुरू होता. मला पळवून लावलं. पण तोपर्यंत माण्याला वाचवणं अशक्य झालं होतं,” विवेकानंद सांगतो. त्याच्या आई-वडिलांना गंभीर दुखापत झाली, दोन दिवस रुग्णालयात होते.
आणखी एक कटू वास्तव
या प्रकरणानंतर हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन कॉन्स्टेबल्स निलंबित करण्यात आले. निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला. “अशा हल्ल्याची शक्यता ओळखायला हवी होती,” असं एसपी आर्या यांनी स्पष्ट केलं.
विवेकानंद म्हणतो, सर्वात मोठी विडंबना म्हणजे तो स्वतः लिंगायत परंपरेत वाढलेला आहे. “मला लहानपणीच लिंग दीक्षा दिली गेली होती. आम्ही मांसाहार करत नाही. बसवण्णांच्या तत्त्वांवर चालतो. पण तरीही जात माझ्या प्रेमावर भारी ठरली,” तो शांतपणे सांगतो.
