कण्णूर: केरळमधील कण्णूर जिल्ह्यातील थलशेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी सीपीएम नेते के. लथीश यांच्या हत्येप्रकरणी सात भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने सर्व सात आरोपी दोषी ठरवत त्यांना 35 वर्षांची सक्तमजुरी, तीही एकत्रितपणे (concurrently) भोगण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच प्रत्येक आरोपीवर 1.4 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा निकाल थलस्सेरी अतिरिक्त सत्र न्यायालय (IV) चे न्यायाधीश जे. विमल यांनी दिला.
advertisement
दोषी ठरवण्यात आलेल्यांमध्ये थलायी येथील पी. सुमिथ (38), कोम्मल वायलचे के. के. प्रगीश बाबू (46), थलायीचा बी. निधिन (37), पुलिक्कूल घराण्यातील के. सनल (37), परेम्मल घराण्यातील स्मिजन (42), कुनीयिल घराण्यातील सजीश (37) आणि पझयामठम घराण्यातील व्ही. जयेश (39) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी पुराव्याअभावी चार आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यामध्ये के. संतोषकुमार, बी. शरत, ई. के. सनीश आणि भाजप नेते व माजी नगरसेवक अजेश (कुन्नुमपुरथ) यांचा समावेश आहे. तर या प्रकरणातील आठवा आरोपी के. अजित याचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता.
2008 मधील थरारक हत्या
31 डिसेंबर 2008 रोजी कण्णूरमधील चक्याथमुक्कू समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडली होती. के. लथीश हे सीपीएमच्या थिरुवंगड लोकल कमिटीचे सदस्य होते. तसेच ते CITU संलग्न मच्छीमार कामगार संघटनेचे क्षेत्रीय संयुक्त सचिव होते.
तलवारी, कुऱ्हाडी आणि मॅचेटीने सज्ज असलेल्या एका टोळक्याने लथीश यांना घेरले आणि अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांना पाहताच लथीश यांनी समुद्रकिनाऱ्यावरील कठडा ओलांडून उडी मारली. मात्र दुसरा आरोपी प्रगीश याने त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. लथीश पाण्यात पडताच इतर आरोपींनी त्यांच्यावर सपासप वार करत हत्या केली.
घटनेची चाहूल लागताच मच्छीमारांसह स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. मात्र आरोपींनी घबराट पसरवण्यासाठी बॉम्ब फेकले आणि घटनास्थळावरून पलायन केले. लथीश यांच्या शरीरावर 25 गंभीर जखमा होत्या. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
भरपाईचे आदेश
न्यायालयाने दंडाची रक्कम भरल्यानंतर त्यातील 5 लाख लथीश यांच्या आई रोहिणी यांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्या सुरेश यांना 75,000 देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
