उज्जैन : जगभरातील शिवभक्तांसाठी महत्त्वाचे स्थान असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जोरदार राडा झाला. पुजारी आणि महंतांमध्ये बाचाबाची, शिवीगाळ झाल्याचा प्रकार बुधवारी घडला. या घटनेनंतर मंदिरात असलेल्या भाविकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. महाकालेश्वर मंदिरातील दर्शनावरून हा वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिराचे महेश पुजारी आणि रिंमुक्तेश्वर मंदिराचे मुख्य पुजारी महावीर नाथ महाराज यांच्यात वाद झाला. श्री महाकालेश्वरच्या दर्शनाच्या व्यवस्थेवरून आणि प्राधान्यावरून हा वाद झाल्याचे वृत्त आहे. या घटनेदरम्यान मंदिर परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दोन्ही बाजूंना शांत केले.
advertisement
महाकालच्या गर्भगृहात वाद
मंदिराचे महेश पुजारी गर्भगृहात उपस्थित असताना वाद सुरू झाला. उज्जैनच्या रिंमुक्तेश्वर मंदिराचे महंत योगी महावीर नाथ, नाथ पंथाचे, गोरखपूरच्या संतांसह गर्भगृहात प्रवेश केला. यादरम्यान महेश पुजारी यांनी त्यांना त्यांची पगडी काढण्यास सांगितले. त्यावरून संत आणि पुजारी यांच्यात जोरदार वाद झाला. या वादात शिवीगाळही करण्यात आली. गर्भगृहात सुरू झालेला हा वाद नंदी हॉलपर्यंत पोहचला. या ठिकाणी हमरीतुमरीसोबत बाचाबाची देखील झाली. मंदिरातील कर्मचाऱ्यांनी आणि इतरांनी दोन्ही बाजूंना शांत केले.
संत समुदायात प्रचंड असंतोष
या घटनेनंतर संत समुदायात व्यापक असंतोष निर्माण झाला आहे. अनेक संतांनी या वादाला मंदिराच्या पावित्र्याविरुद्ध असल्याचे म्हटले आहे आणि मंदिर प्रशासनाशी संबंधित पुजाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक आखाडा परिषदेच्या बॅनरखाली, संतांनी प्रथम मंदिर प्रशासकाशी संपर्क साधला आणि त्यांची बाजू मांडली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क साधला आणि तेथेही पुजाऱ्याला मंदिरातून काढून टाकण्याची मागणी केली.
चौकशी सुरू
दरम्यान, मंदिर प्रशासक प्रथम कौशिक यांनी सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर महाकाल मंदिर व्यवस्थापन समितीने चौकशी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांशी चर्चा सुरू आहे. या वादावर लवकरच तोडगा काढला जाईल.
याच घटनेबाबत मंदिराचे महेश पुजारी यांनी सांगितले की, महंत योगी महावीर नाथ दररोज मंदिरात येतात आणि वादात अडकतात. आज देखील गर्भगृहात त्यांचा वाद झाला. त्यांनी मला शिवीगाळ केली. ते मंदिराच्या शिष्टाचाराचे उल्लंघन करतात आणि पुजाऱ्याचे ऐकत नसल्याचेही महेश यांनी सांगितले. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असून नियमांचे उल्लंघन करून पगडी घालून गर्भगृहात प्रवेश केला असल्याचा आरोप त्यांनी केला.
महंत योगी महावीर नाथ म्हणाले की, ते गोरखपूर येथील एका संतासह महाकाल मंदिरात दर्शनासाठी आले होते. महेश पुजारी यांनी गर्भगृहात अश्लील वर्तन केले. त्याने महाराजांची पगडी काढली. त्यांनी असे वागायला नको होते. ते ब्राह्मणांच्या नावावर कलंक असून. जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासकांशी चर्चा झाली आहे. आता महेश पुजारी यांना बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली आहे.