सध्या जगभरात हवामानाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. भारतामध्ये आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर 'मोंथा' चक्रीवादळाचा धोका वाढत असताना, दुसरीकडे कॅरिबियन समुद्रात तयार झालेले मेलिसा हे वादळ आता कॅटेगरी-५ या सर्वात धोकादायक चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. हे वादळ वेगाने पुढे सरकत असल्याने मुसधार पाऊस, जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे मोठी जीवित व वित्तहानी होण्याची भीती आहे. ही दोन्ही वादळे जगाला एका मोठ्या संकटाचे स्पष्ट संकेत देत आहेत.
advertisement
२४ तासात 'मेलिसा'चा विध्वंसक रुप
'मेलिसा' या वादळाच्या तीव्रतेत झालेली वाढ थक्क करणारी आहे. शनिवारी या वादळाचा वेग ताशी ११0 किलोमीटर होता, पण केवळ २४ तासांत त्याची गती तब्बल २२५ किलोमीटर प्रतितास झाली! यामुळे ते सर्वात धोकादायक कॅटेगरी-५ चक्रीवादळ बनले आहे. या तीव्रतेच्या वादळात मोठी आणि मजबूत बांधकामे देखील पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकतात. वादळाचा हा प्रचंड वेग आणि वाढती शक्ती जगाला चिंतेत टाकणारी आहे.
शास्त्रज्ञांचा इशारा तापमान वाढतेय, वादळे तीव्र होत आहेत
या परिस्थितीबद्दल हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ही वादळे आता पूर्वीपेक्षा खूप लवकर तीव्र होत आहेत आणि कधीकधी एकाच जागी थांबून राहतात. ही स्थिती सामान्य नाही. यामागे एकच मोठे कारण आहे. पृथ्वीचे वाढत असून समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे ही वादळे जास्त ऊर्जा खेचून घेत आहेत.
समुद्राचे पाणी ठरतेय वादळाचे 'इंधन'
वादळांना ही एवढी प्रचंड ऊर्जा मिळते कुठून? एमआयटीचे वैज्ञानिक केरी इमॅन्युएल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, "यावेळी अटलांटिक महासागरात जास्त वादळे तयार झाली नाहीत, पण जी झाली, ती अत्यंत वेगाने शक्तिशाली झाली. हे हवामान बदलाचे स्पष्ट चिन्ह आहे."जेव्हा समुद्राचे पाणी जास्त गरम होते, तेव्हा वादळं तयार होण्यासाठी पोषक वातावरण असतं, कमी दाबाचा पट्टा तयार होतो, समुद्रातलं वाऱ्याचं प्रेशर वाढतं आणि ते अधिक विध्वंसक बनतात. समुद्राच्या वाढलेल्या तापमानाचा हा थेट परिणाम आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार क्लाइमेट सेंट्रलचे वैज्ञानिक डॅनियल गिलफोर्ड यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांच्या मते, वातावरणातील वाढलेली उष्णता कधीकधी वादळांना कमकुवत करू शकते, पण दुसरीकडे समुद्राचे वाढलेले तापमान त्यांना अधिक ताकद देते. आणि अशा परिस्थितीत बहुतेक वेळा समुद्रच जिंकतो. 'मेलिसा' ज्या समुद्री भागातून पुढे सरकले, तिथले पाणी सामान्य तापमानापेक्षा तब्बल १.४ अंश सेल्सिअसने अधिक गरम होते; आणि ही वाढलेली उष्णता मानवामुळे झालेल्या हवामान बदलातून आली आहे, असे शास्त्रज्ञांचे ठाम मत आहे.
मोंथाचं संकट चार दिवस पाऊस
भारताच्या आंध्र प्रदेशमध्येही 'मोंथा' चक्रीवादळाचा धोका वेगाने वाढत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे वादळ सतत अधिक शक्तिशाली होत आहे. आज चक्रीवादळात त्याचं रुपांतर झालं असून ते लवकरच लॅण्डफॉल होण्याची शक्यता आहे. पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मछलीपट्टणम-कलिंगपट्टणम दरम्यान धडक
मौसम विभागाचा अंदाज आहे की, हे वादळ काकीनाडाजवळ, मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणमच्या दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकू शकते. 'मोंथा' किनारपट्टीवर धडकण्याच्या वेळी वाऱ्याचा वेग ९० ते १०० किलोमीटर प्रतितास असेल, तर तीव्र झोंके ११० किलोमीटर प्रतितासपर्यंत पोहोचू शकतात. प्रशासनाने तटीय आणि सखल भागातील रहिवाशांना अत्यंत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे, तसेच गरज पडल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्लाही नागरिकांना दिला आहे.
