ओडिशामध्ये भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत विजिलन्सने रविवारी एका आयएएस (IAS) अधिकाऱ्याला १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही लाच एका स्थानिक व्यावसायिकाकडून घेतली जात होती. आरोपी अधिकारी कालाहांडी जिल्ह्यातील धर्मगढ येथे उप-जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहे. दक्षता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्याने एकूण २० लाख रुपयांची लाच मागितली होती, त्यापैकी १० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्याला पकडण्यात आले.
advertisement
मिळालेल्या तक्रारीच्या आधारे दक्षता विभागाने उप जिल्हाधिकाऱ्यावर पाळत ठेवली होती. अधिकाऱ्याने तक्रारदाराला धर्मगढ इथे आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावले होते आणि तिथेच त्याने लाचेची रक्कम घेतली. आयएएस अधिकाऱ्याने घेतलेली लाच आपल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये लपवली होती. त्याच वेळी दक्षता विभागाच्या पथकाने छापा टाकून त्याला तात्काळ अटक केली.
अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर दक्षता पथकाने त्याच्या सरकारी निवासस्थानाची झडती घेतली. या झडतीदरम्यान, आतापर्यंत 47 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम कुठून आली, याबाबतचा स्रोत तपासला जात आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे वय अंदाजे 35 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या आरोपी अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दक्षता विभागाची पथके त्याची कसून चौकशी करत असून, त्याच्या इतर ठिकाणांवरही छापे टाकले जात आहेत. सूत्रांनुसार, हे प्रकरण राज्य प्रशासनात पसरलेल्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकते. आयएएस अधिकाऱ्यासारख्या उच्च पदावरील व्यक्तीने लाच घेणे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर सामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वासही तोडणारे आहे. दक्षता विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, अशा प्रकरणांमध्ये त्यांनी गप्प राहू नये आणि कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराची तक्रार थेट विभागाकडे करावी. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.