या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं. भारतात गेल्या तीन दशकांपासून दहशतवाद पसरवणारे दोन मोठे गट – जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैयबा या दोन गटांना उद्धवस्त करण्याचे लक्ष्य होते.
बहावलपूरवरच का टार्गेट?
पाकिस्तानमधील 12 व्या क्रमांकाचं मोठं शहर असलेलं बहावलपूर, हे जैश-ए-मोहम्मदचं मूळ केंद्र आहे. लाहोरपासून सुमारे 400 किलोमीटरवर असलेलं हे शहर म्हणजे जैशचा अड्डा समजला जातो. इथंच 'जामिया मस्जिद सुब्हान अल्लाह' – म्हणजेच उस्मान-ओ-अली कॅम्पस – या नावाने ओळखलं जाणारं मुख्यालय आहे.
advertisement
हा परिसर साधारण 18 एकरमध्ये पसरलेला आहे. येथे जैशसाठी भरती, फंडिंग आणि प्रशिक्षण सगळं चालतं. भारताच्या कारवाईत हे मुख्यालयही निशाण्यावर होतं. जैशचा संस्थापक मसूद अजहर हाच या शहरात राहतो. अत्यंत कडेकोट सुरक्षा असलेल्या एका गुप्त ठिकाणी तो राहत असल्याची माहिती आहे.
जैशवर बंदी, पण पाकिस्तान सरकारचं मौन
जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तान सरकारने 2002 मध्ये बंदी घातली होती. पण ही बंदी कागदावरच राहिली. प्रत्यक्षात या संघटनेला काम करण्याची मोकळीक देण्यात आली. त्यांचा अड्डा, पाकिस्तानच्या ३१व्या लष्करी कोरच्या मुख्यालयाजवळ आहे – म्हणजे सैन्य तळाजवळच. काही गुप्तचर अहवालांनुसार, इथे गुप्त अणु ठिकाणं सुद्धा असण्याची शक्यता आहे.
ही जवळीकच ISI आणि जैशमधल्या संबंधांची आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या संरक्षणाची स्पष्ट साक्ष देत आहे.
‘मस्जिद’ की दहशतवादी ट्रेनिंग सेंटर?
‘जामिया मस्जिद सुब्हान अल्लाह’ – नावाने सामान्य वाटणारी ही इमारत, प्रत्यक्षात एक मोठं ट्रेनिंग सेंटर आहे. सुरुवातीला 2011 पर्यंत हे एक छोटं मदरसा होतं. पण 2012 पासून याचं रूप पालटलं. सॅटेलाईट इमेजमध्येही स्पष्ट दिसतं – मोठा हॉल, 600 विद्यार्थ्यांसाठीची व्यवस्था, स्विमिंग पूल, घोड्यांचे तबेले, जिम... हे सगळं एक दहशतवादी संघटना वापरत आहे. या सगळ्याच्या आड जैशचं फ्रंट ऑर्गनायझेशन समजली जाणारी अल रहमत ट्रस्ट कार्यरत होतं.
मसूद अजहर कोण?
1968 मध्ये जन्मलेला मसूद अजहर याला 1994 साली भारतात अटक करण्यात आली होती. त्याआधी तो अफगाणिस्तानात हरकत-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता. नंतर त्याची सुटका झाली. त्यानंतर त्याने थेट जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली.
त्याच्या विचारांना देवबंदी विचारसरणीचा कट्टर पगडा होता. 1999 मध्ये काठमांडूनं दिल्लीला येणारी इंडियन एअरलाइन्सची फ्लाइट हायजॅक झाली. भारत सरकारला अजहर, उमर शेख आणि मुश्ताक झरगर यांना सोडावं लागलं. याच घटनेनंतर अजहर पुन्हा पाकिस्तानात परतला आणि दहशतीचा नवा अध्याय सुरू झाला.
ओसामा बिन लादेनशी भेट
जैशच्या स्थापनेपूर्वी मसूद अजहर अफगाणिस्तानात ओसामा बिन लादेन याची भेट घेतली होती. त्यानंतर ISIने त्याला मदत केली – फंडिंग, परदेशी दौरे, प्रशिक्षक सगळं काही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने पुरवलं.
जैशची दहशतवादी प्रशिक्षण केंद्र आणि हालचालींचे केंद्र हे POK आणि खैबर पख्तूनख्वा भागात आहे. बहावलपूर हे त्यांचं ब्रेनवॉश आणि भरतीसाठीचं मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणावरूनच भारतात दहशतवादाचा पसरवला जातो.