काही ठिकाणी पाकिस्तान भारतीय सीमा हद्दीत हल्ला करण्यात यशस्वी झालं. पण भारताने प्रत्येक वेळी त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आता भारताने तर थेट पाकिसतानातील हवाई तळ उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, पाकिस्तानने आता सर्व विमानतळावरून होणारी हवाई उड्डाणं रद्द केली आहेत. त्यामुळे पाकिस्तान युद्धभूमीवर बॅकफुटला जाताना दिसत आहे. अशात आता पाकिस्तानकडून रडीचा डाव सुरू झाला आहे.
advertisement
भारतावर थेट हल्ला करणं कठीण जात असल्याने आता पाकिस्तानकडून सामान्य नागरिकांना टार्गेट करण्याचा प्लॅन आखल्याची माहिती समोर आली आहे. ज्या व्यक्तींकडे स्मार्ट फोन आहे, असे सर्वच नागरिक पाकिस्तानच्या टार्गेटवर आले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान भारतीयांवर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर यंत्रणेने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतीय लोकांनी कुठल्याही अज्ञात फाईल्स, लिंकवर क्लिक करू नये, असं आवाहन केलं जात आहे.
विशेष म्हणजे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यापासून भारतावर तब्बल १० लाख सायबर हल्ले झाले आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने 'इकोज ऑफ पहलगाम' नावाचा एक अहवाल तयार केला आहे. या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात सायबर हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे महाराष्ट्र सायबरचे प्रमुख यशस्वी यादव यांनी सांगितले. धक्कादायक म्हणजे हे हल्ले फक्त डिजिटल स्वरुपाचे नाही तर एका संघटित सायबर युद्धाचा भाग असल्याचेही यादव यांनी सांगितलं.
महाराष्ट्र सायबर विभागाच्या या अहवालानुसार सायबर हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्व, मोरोक्को आणि इंडोनेशिया या देशांमधून केले जात आहेत. हे सर्व हल्लेखोर स्वतःला इस्लामिक गट असल्याचे सांगणारे सायबर संघटन आहेत. यापैकी 'टीम इन्सेन पीके' हा गट सर्वाधिक सक्रिय आहे. हा पाकिस्तानचा 'अॅडव्हान्स्ड पर्सिस्टंट थ्रेट' (APT) गट आहे. या गटाने आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, सैनिक कल्याण विभाग आणि अनेक आर्मी पब्लिक स्कूलच्या वेबसाइट्सना लक्ष्य केले आहे. इतक नाही तर असुरक्षित PDF फाइल ओपन करताच त्यातून मोबाईल आणि संगणक हॅक केले जात आहेत. गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगार पीडीएफचा वापर करून गोष्टी हॅक करत आहेत.
कोणाला सर्वाधिक धोका
या सायबर हल्ल्यांमध्ये वेबसाइट्स हॅक करणे (डिफेसमेंट), सीएमएसमधील त्रुटींचा वापर करणे (सीएमएस एक्सप्लॉइटेशन) आणि कमांड अँड कंट्रोल अटॅक यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त बांगलादेशमधील 'मिस्टीरिअस टीम बांगलादेश' (MTBD) आणि इंडोनेशियातील 'इंडो हॅक्स सेक' हे गट देखील सक्रिय आहेत. या गटांनी भारतीय टेलिकॉम डेटा आणि लोकल ॲडमिन पॅनेल्सना लक्ष्य केले आहे.
या अहवालातील आणखी एक गंभीर खुलासा म्हणजे अनेक ठिकाणी सायबर सुरक्षा व्यवस्था कमजोर असल्यामुळे हे हल्ले यशस्वी झाले आहेत. डार्क वेबवर भारतीय टेलिकॉम कंपन्यांचा टेराबाइट डेटा लीक झाला आहे. यामुळे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.