जम्मू काश्मीरमधील पुंछच्या डुंगस येथे पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या तोफगोळ्याचे भयानक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. भारत पाकिस्तान यांच्यात जोरदार लष्करी संघर्ष सुरू असताना ७ मे रोजी पाकिस्तानने डुंगस येथील नाथबाबाच्या मंदिराच्या परिसरात तोफगोळा डागला होता.
देव तारी त्याला कोण मारी... भक्त थोडक्यात वाचला, अंगावर काटा आणणारा VIDEO
नाथबाबा मंदिरापासून ५० मीटर अंतरावर तोफगोळा पडल्याने तेथील घरांचे, गाड्यांचे तसेच दुकानांचे मोठे नुकसान झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की पाकिस्तानने डागलेला तोफगोळा पडण्याच्या काही सेकंद आधी, एक व्यक्ती तेथून पळत पळत जाते, त्याने मुख्य रस्ता ओलांडताच मागून तोफगोळ्याचा स्फोट होतो. अगदी काही सेकंदामुळे त्या व्यक्तीचा जीव थोडक्यात वाचतो. देव तारी त्याला कोण मारी, असे म्हटले जाते, ही म्हण सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर आपसूक ओठावर येते.
advertisement
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. याअंतर्गत पाकिस्तानातील ९ दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले. या कारवाईत अनेक प्रमुख दहशतवादी ठार झाल्याचे भारतीय लष्कराचे म्हणणे आहे. भारताच्या कारवाईनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारतीय सीमेलगतच्या गावांना लक्ष्य करून तिकडे गोळीबार केला. जम्मू काश्मीरच्या पुंछ, राजौरी, आदी भागांत पाकिस्तानने गोळीबार केला. या गोळीबारात सहा सामान्य नागरिकांचे जीव गेले तर ऑपरेशन सिंदूर राबविताना आठ लष्कराच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले.