भारतीय राजकारणातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि प्रभावी निवडणूक घोषवाक्यांपैकी एक म्हणजे “अबकी बार मोदी सरकार.” या चार शब्दांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला नवी दिशा दिली आणि नरेंद्र मोदी यांना देशभरात एक प्रखर नेतृत्व म्हणून उभं केलं. पण या घोषवाक्यामागची गोष्ट तितकीच रोचक आणि प्रेरणादायी आहे.
advertisement
अलीकडेच केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी उघड केलं की, या घोषवाक्याचा जन्म प्रसिद्ध जाहिराततज्ज्ञ पियूष पांडे यांच्या मनात झाला. मात्र ही निर्मिती एका क्षणात घडलेली नव्हती. ती सात तासांच्या संवादानंतर आणि एका रात्रीच्या विचारांनंतर साकार झाली.
पहिला नकार आणि सात तासांची चर्चा
पियूष गोयल यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा पियूष पांडे यांना 2014 च्या प्रचार मोहिमेसाठी काम करण्याची विनंती केली, तेव्हा पांडे यांनी ती सरळ नाकारली. त्यांना वाटलं, राजकीय मोहिमेसाठी काम करणं त्यांच्या ब्रँडच्या मर्यादांच्या बाहेर आहे. पण गोयल हार मानले नाहीत.
त्यांनी पांडे यांच्यासोबत तब्बल सात तास बसून चर्चा केली. देशाच्या बदलत्या राजकीय परिस्थितीबद्दल, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाबद्दल आणि भारतासमोर उभ्या असलेल्या आव्हानांबद्दल. तरीही त्या दिवशी पियूष पांडे यांनी नकार कायम ठेवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आलेला निर्णय
मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी गोयल यांचा फोन वाजला. समोरून पियूष पांडे होते. त्यांच्या आवाजात निर्धार होता. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, “मी हे काम करीन... कारण ही देशाची गरज आहे. (Yeh desh ki zaroorat hai.)
आणि त्या क्षणी भारताच्या राजकीय प्रचार इतिहासात एक नवं पान लिहिलं गेलं. काही दिवसांतच पांडे यांच्या सर्जनशीलतेतून जन्म झाला “अबकी बार मोदी सरकार” हे घोषवाक्य, जे केवळ प्रचाराचं साधन नव्हतं, तर देशातील जनतेच्या भावनांचं प्रतीक बनलं.
एका कल्पनेने बदललं निवडणुकीचं चित्र
या स्लोगनने प्रचार मोहीमेचं संपूर्ण रूप बदललं. रेडिओपासून टीव्हीपर्यंत, रस्त्यांवरील होर्डिंग्जपासून सोशल मीडियापर्यंत, या चार शब्दांनी प्रत्येक भारतीयाच्या कानावर एकच संदेश पोहोचवला “बदलाची वेळ आली आहे.” पियूष पांडे यांच्या क्रिएटिव्ह दृष्टिकोनाने आणि पियूष गोयल यांच्या सातत्याने तयार झालेलं हे घोषवाक्य आजही भारतीय राजकारणात मार्केटिंग आणि कम्युनिकेशनचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून पाहिलं जातं.
