ऑपरेशन सिंदूर फक्त सीमारेषेपर्यंत सीमित नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या मनातली भावना आहे. 22 तारखेला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचं उत्तर भारताने ऑपरेशन सिंदूर करत 22 मिनिटांत दिलं. नौदल, हवाई दल आणि सैन्यदलांना सूट दिली होती. ज्या लेकींचं सौभाग्य मिटवलं ते कायमचे मातीमोल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीकानेरमध्ये बोलताना पुन्हा एकदा दहशतवादावर जोरदार हल्ला चढवला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून आपल्या बहिणींच्या सौभाग्याचा अपमान केला. त्यांचं कुंकू पुसलं. त्या गोळ्या जरी पहलगाममध्ये झाडल्या गेल्या, तरी त्या गोळ्यांनी १४० कोटी भारतीयांच्या मनात वेदना देणाऱ्या आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात बदल्याची भावना होती. सर्वांनी निर्धार केला दहशतवाद संपवायचा, आणि त्यांना अशा अद्दल घडवायची ज्याचा विचार त्यांनी स्वप्नातही केला नसेल. आज तुमच्या पाठींब्याने, आणि आपल्या शूर जवानांच्या साहसामुळे आपण त्या निर्धाराला खरं ठरवलं.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना पुढे म्हणाले, आपल्या सरकारने सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि तिन्ही सैन्यदलांनी मिळून असं चक्रव्यूह उभं केलं की पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. २२ तारखेला झालेल्या हल्ल्याला उत्तर देताना, २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे ९ मोठे तळ उद्ध्वस्त केले. ज्या लोकांनी आपल्या बहिणींचं सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला, त्यांना आपण मातीत गाडलं. जे लोक भारताच्या शांततेला कमकुवत समजत होते, आणि आपल्या शस्त्रांचा अहंकार करत होते, आज तेच लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. हे केवळ प्रतिशोध नव्हे, ही आहे नव्या न्यायाची भावना. हे ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे जे रागातून नाही, तर न्यायासाठी वापरलं गेलं.
पंतप्रधान म्हणाले की, अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत घाबरत नाही. जो कोणी दहशतवादाला पाठबळ देईल त्याला अशीच उद्दल घडेल, त्यांच्यासाठी कोणताही वेगळा न्याय नाही. तो देश असो की त्यामागे असलेली व्यवस्था. पाकिस्तानचा हा ‘स्टेट’ आणि ‘नॉन-स्टेट’ एक्टरचा खेळ आता खपवून घेतला जाणार नाही. पाकिस्तान भारताशी थेट लढाईत कधीही जिंकू शकला नाही. प्रत्येक वेळेस त्याला हार पत्करावी लागली. म्हणूनच त्यांनी दहशतवादाचं हत्यार निवडलं. वर्षानुवर्षे हीच नीती चालू होती. निर्दोष लोकांना मारून भारतात भीतीचं वातावरण निर्माण केलं जात होतं. पण आता पाकिस्तानने एक गोष्ट विसरली, आता भारतात मोदी आहेत.
मोदी म्हणाले, माझं मन शांत आहे, पण रक्त सळसळत आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला किंमत मोजावी लागेल. ती किंमत त्यांच्या लष्करालाही आणि अर्थव्यवस्थेलाही भोगावी लागेल. पाकिस्तानने नाल एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण यश आलं नाही. उलट पाकिस्तानचं राहिमयार खान एअरबेस आज आयसीयूमध्ये आहे. ना व्यापार होणार, ना चर्चा. जर चर्चा झालीच, तर ती फक्त पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरबद्दल म्हणजे POK वर चर्चा करणार आहे. भारताच्या हक्काचं पाणी भारतातच येईल. भारतीयांच्या भावनांशी खेळणं पाकिस्तानला महागात पडेल. हे भारताचं वचन आहे आणि हे वचन कोणीही मोडू करू शकणार नाही असा थेट इशारा पीएम मोदी यांनी बिकानेरच्या सभेतून पाकिस्तानला दिला.