महाराजांच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी भक्त दिवसभर सोशल मीडियावर किंवा त्यांच्या आश्रमाच्या माध्यमातून अपडेट मिळवण्याची वाट पाहत असतात. मंगळवारी सकाळी जेव्हा ते बिरला मंदिराजवळील एका डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये तपासणीसाठी पोहोचले, तेव्हा भक्तांची प्रचंड गर्दी जमली. प्रेमानंदजींच्या दर्शनासाठी इतकी लोकं आली की पोलिसांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराजांना काही दिवसांपासून पोटात सूज आणि वेदना जाणवत आहेत. याच तपासणीसाठी त्यांना सीटी स्कॅनसाठी या सेंटरमध्ये आणण्यात आलं. जरी त्यांना अतिशय गुप्तपणे आणण्यात आलं होतं, तरीही ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचताच शेकडो लोक बाहेर जमले.
advertisement
अधिकृतरीत्या त्यांच्या सीटी स्कॅन रिपोर्टविषयी काहीही सांगितलं गेलं नाही आहे. सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना सेंटरच्या मागच्या दरवाजातून बाहेर काढण्यात आलं. मात्र, मंगळवारी त्यांच्या ‘भजन मार्ग’ या यूट्यूब चॅनेलवर त्यांच्या संवादाचा नवा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. यात त्यांच्या चेहऱ्यावर आणि हातावर पुन्हा सूज दिसून येते, तसेच त्यांच्या आवाजातही त्या अस्वस्थतेचा थोडा परिणाम जाणवतो.
याआधी जेव्हा त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा झाली होती, तेव्हा राधा केली कुंज आश्रमाकडून सांगण्यात आलं होतं की प्रेमानंदजींची तब्येत स्थिर आहे आणि ते हळूहळू बरे होत आहेत. सध्या ते वृंदावनमधील आश्रमातच नियमित डायलिसिस उपचाराखाली आहेत आणि आश्रमाच्या मते, त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे.