नवी दिल्ली: इंटरपोलने दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलद्वारे उघडकीस आलेल्या तब्बल 13,000 कोटींच्या कोकेन जप्तीप्रकरणातील फरार आरोपी ऋषभ बैसोया विरुद्ध रेड नोटिस जारी केली आहे. या कारवाईनंतर आता त्याचा शोध घेण्यासाठी जगभरात मोहीम सुरू करण्यात आली असून विविध देशांतील कायदा अंमलबजावणी संस्था औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही मार्गांनी त्याचा मागोवा घेत आहेत.
advertisement
विशेष सेलने न्यायालयाला अनुपस्थितीत खटला चालवण्याची (Trial in Absentia) परवानगी देण्याची विनंतीही केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. ऋषभ सध्या मध्यपूर्वेत लपलेला असल्याचा संशय आहे. यापूर्वी न्यायालयाने त्याला फरार आरोपी (Proclaimed Offender) घोषित केले होते.
रेड नोटिस म्हणजे काय
रेड नोटिस ही इंटरपोलकडून जगभरातील पोलिस यंत्रणांना दिली जाणारी अशी सूचना असते, ज्याद्वारे एखाद्या आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला अटकपूर्व ताब्यात घेण्यास सांगितले जाते. जेणेकरून त्याला त्याच्या देशात परत आणून न्यायालयीन प्रक्रिया सुरू करता येईल. ही नोटिस सामान्यतः खून, चोरी, भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थ तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी जारी केली जाते. रेड नोटिस ही आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट नसली तरी ती देशांदरम्यान कायदा अंमलबजावणी संस्थांमधील सहकार्याची औपचारिक मागणी असते. या नोटिसमुळे आरोपीच्या प्रवासावर निर्बंध येतात, त्याची मालमत्ता गोठवली जाऊ शकते आणि प्रत्यर्पण प्रक्रिया सुलभ होते.
अनुपस्थितीत खटला (Trial in Absentia):
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत “अनुपस्थितीत खटला” या तरतुदीनुसार, जर आरोपी न्यायालयासमोर उपस्थित नसेल आणि त्याला फरार आरोपी घोषित करण्यात आले असेल, तर न्यायालय खटला चालवू शकते व निकाल देऊ शकते. मात्र यासाठी काही अटी आहेत. जसे की, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर किमान 90 दिवस थांबावे लागते. आणि त्या कालावधीत आरोपीने समन्सकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्याविरुद्ध अनुपस्थितीत खटला सुरू होऊ शकतो.
कौन आहे ऋषभ बैसोया
ऋषभ हा वीरेंद्र सिंह बैसोया उर्फ वीरू यांचा मुलगा आहे, जो एका आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेलचा प्रमुख असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ऋषभवर या कार्टेलच्या अमली पदार्थांच्या वाहतूक आणि लपवाछपवीमध्ये थेट सहभागाचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 1 ऑक्टोबर 2024 रोजी त्याने आपल्या सहआरोपी जतिंदर सिंग गिल उर्फ जस्सी याला एक टोयोटा फॉर्च्युनर SUV दिली होती. ज्याद्वारे अमली पदार्थांची वाहतूक केली जात होती.
ही गाडी पंजाबमधील अजनाला परिसरातील नेपाळ गावात पोलिसांनी अडवली आणि त्यातून सुमारे 1 किलो कोकेन/मेफेड्रोन जप्त करण्यात आले. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ऋषभ आणि जस्सी दोघेही दिल्लीतील हुडको प्लेस आणि पंचशील एन्क्लेव्ह येथील एका हॉटेलमध्ये एकत्र दिसले. यामुळे ऋषभचा थेट सहभाग सिद्ध झाला.
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजात म्हटले आहे की, आरोपी अटकेपासून आणि खटल्यापासून पळ काढत आहे. एनडीपीएस प्रकरणात जप्त झालेल्या मोठ्या प्रमाणातील अंमली पदार्थांच्या चौकशीत त्याच्याविरुद्ध आधीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय कार्टेलचा उलगडा
विशेष सेलच्या तपासात उघड झाले की, या कार्टेलने फार्मास्युटिकल कंपन्या आणि शेल कंपन्यांचा वापर करून दक्षिण अमेरिकेतून आणलेले कोकेन भारतभर वितरित केले. या कार्टेलचे सदस्य ड्रग्सच्या डिलिव्हरीसाठी गुगल कोऑर्डिनेट्स शेअर करत असत, ज्याद्वारे माल विविध ठिकाणी साठवला जात असे. नंतर या मालाची विक्री दिल्ली, पंजाब, मुंबई, हैदराबाद आणि गोवा येथील म्युझिक कॉन्सर्ट्स आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये केली जात असे.
अंमली पदार्थ रसायनांच्या स्वरूपात लपवले जात आणि शर्ट्स व नमकीनच्या बॉक्समध्ये पॅक करून वाहतूक केली जात होती, असे पोलिसांनी सांगितले. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली हा कार्टेल पाकिस्तान आणि दुबईमधून चालवला जात होता. तर त्याचे सदस्य थायलंड, मलेशिया आणि युनायटेड किंगडममध्ये पसरलेले होते.
दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने या देशांना ‘लेटर रोगेटरी’ (Letters Rogatory) पाठवून तपासात सहकार्याची विनंती केली आहे. या संपूर्ण प्रकरणाने भारतातील अंमली पदार्थ तस्करी आणि आंतरराष्ट्रीय कार्टेल्सच्या साखळीचे जाळे उघड केले असून, इंटरपोलची ही रेड नोटिस या ड्रग नेटवर्कविरोधातील मोठी कारवाई मानली जात आहे.
