रात्रीचे साधारण 10 वाजले होते. दक्षिण गोव्याचे रस्ते तसे शांत आणि निर्जन. एक विदेशी महिला पर्यटक आपल्या हॉटेलकडे पायी जाण्यासाठी निघाली होती. तिने गुगल मॅप्सचा आधार घेतला, पण तांत्रिक बिघाडामुळे ॲपने तिला चुकीचा रस्ता दाखवला. रस्ता चुकून ती तरुणी अशा ठिकाणी पोहोचली जिथे ना कोणी माणूस होता ना कसली रोषणाई. अखेर घाबरलेली, भेदरलेली ती तरुणी रस्त्याच्या कडेला उभी राहून रडत होती.
advertisement
देवदूत बनून आली 'सिंधू कुमारी'
त्याच वेळी तिथून 'रॅपिडो' (Rapido) रायडर सिंधू कुमारी जात होती. एका महिलेला अशा अवस्थेत पाहून सिंधूने आपली दुचाकी थांबवली. परदेशी तरुणी प्रचंड दहशतीत होती, पण सिंधूने अत्यंत संयमाने तिला शांत केलं आणि मदतीचा हात दिला. सिंधूने तिला आपल्या दुचाकीवर बसवून सुखरूप 'हॉटेल कोकोनट ग्रोव्ह बीच रिसॉर्ट'वर सोडले.
"पैसे नकोत, तुम्ही सुरक्षित आहात हेच महत्त्वाचं"
हॉटेलवर पोहोचल्यानंतर त्या पर्यटकाने सिंधूला प्रवासाचे पैसे देऊ केले, पण सिंधूने ते घेण्यास स्पष्ट नकार दिला. "पैसे राहू द्या, तुम्ही सुरक्षित पोहोचलात हे जास्त महत्त्वाचे आहे," असं म्हणत सिंधूने तिला तिचा इंस्टाग्राम आयडी दिला, जेणेकरून भविष्यात काही अडचण आल्यास ती संपर्क करू शकेल. शिवाय तिने तिच्याबद्दल लोकांना सांगायला आणि फॉलो करायला सांगितलं. सिंधूच्या या निस्वार्थी वागण्याने त्या विदेशी तरुणीच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आले.
या घटनेचा व्हिडिओ 'X' (ट्विटर) वर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी सिंधू कुमारीवर कौतुकाचा वर्षाव केला. एका युजरने लिहिले, "हेच खरं भारत दर्शन आहे. जेव्हा तंत्रज्ञान अपयशी ठरतं, तेव्हा माणुसकी धावून येते." तर दुसऱ्याने म्हटले, "सिंधूने केवळ लिफ्ट दिली नाही, तर भारताची सुरक्षित प्रतिमा जगासमोर मांडली आहे."
आजच्या काळात जिथे महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात, तिथे सिंधू कुमारी सारख्या सामान्य व्यक्ती आपल्या धाडसाने आणि माणुसकीने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवतात.
