एसएसबी जवानाच्या पत्नीला नुकताच मुलगी झाली, पण बाळंतपणानंतर उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आता १५ दिवसांची निरागस मुलगी ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यात आपल्या कुटुंबासोबत आहे, तर तिचे वडील, जे भारत-भूतान सीमेवर कर्तव्य बजावत होते, त्यांना घरी परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे.
ओडिशाचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी या घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं. जवानाच्या पत्नीच्या निधनाच्या वृत्तानं मन अत्यंत दुःखी आहे. जवान आपल्या पत्नीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकेल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत." मृत महिला, लिपी गंड (वय २८), या सशस्त्र सीमा बल (एसएसबी) मध्ये कार्यरत जवान देबराज गंड यांच्या पत्नी होत्या. देबराज हे झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर ब्लॉकमधील तेंगनामल गावचे रहिवासी आहेत.
advertisement
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा लिपीने बाळाला जन्म दिला, तेव्हा देबराज तिच्यासोबत होते. मात्र, मुलीच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी एसएसबीचा तातडीचा फोन आल्याने त्यांना ड्युटीवर जावं लागलं. २८ एप्रिल रोजी मुलीला जन्म दिल्यानंतर, लिपी यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी सांगितले की, प्रसूतीनंतर लगेचच तिची तब्येत गंभीर झाली आणि ती गेल्या १५ दिवसांपासून बेशुद्ध होती. अखेर सोमवारी रात्री बुर्ला येथील विमसार रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. अवयव निकामी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मंत्री पुजारी यांनी सांगितले की, लिपीला एअर ॲम्ब्युलन्सने भुवनेश्वरला हलवण्याची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु दुर्दैवाने सोमवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. "जवान आणि त्याच्या कुटुंबाबद्दल आम्हाला खूप सहानुभूती आहे," असे ते म्हणाले. देबराज यांना या दु:खद घटनेची माहिती देण्यात आली असून, ते ओडिशात परतत आहेत. पुजारी म्हणाले, "तो अरुणाचल प्रदेशहून गुवाहाटीला येईल, त्यानंतर विमानाने कोलकाताला आणि तेथून झारसुगुडाला पोहोचेल. आम्हाला अपेक्षा आहे की तो आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत झारसुगुडाला पोहोचेल."
या हृदयद्रावक घटनेमुळे १५ दिवसांच्या नवजात मुलीवर पितृत्वाचे छत्र हरपले आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या एका जवानाला आपल्या पत्नीच्या अंतिम दर्शनासाठी परत यावे लागत आहे, हे अत्यंत वेदनादायी आहे. या कठीण परिस्थितीत जवान आणि त्याच्या कुटुंबाला धीर मिळो, अशी प्रार्थना सर्वत्र केली जात आहे.