शुक्रवारी रात्री कामावरून घरी परतताना युवराजची कार सेवा रस्त्यालगत असलेल्या ड्रेनेजच्या उंच कडेला धडकली. हा कडा दोन ड्रेनेज बेसिन वेगळे करणारा होता. धुक्यामुळे रस्त्याची दिशा न समजल्याने कार थेट सुमारे 70 फूट खोल, पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली.
अपघातानंतर काही वेळातच आसपास जाणाऱ्या नागरिकांना युवराजच्या मदतीसाठीच्या किंकाळ्या ऐकू आल्या. त्यांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. या काळात युवराजने आपल्या वडिलांना (राजकुमार मेहता) यांना फोन केला. 'बाबा, मी पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात पडलो आहे. मी बुडतोय. कृपया वाचवा, मला मरायचं नाही', असे सांगितले. हा कॉल कुटुंबासाठी आयुष्यभराची जखम ठरला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफ (NDRF) पथक घटनास्थळी दाखल झाले. युवराजचे वडीलही तिथे उपस्थित होते. सुमारे पाच तास चाललेल्या बचावकार्यानंतर कार आणि युवराजला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
या घटनेनंतर युवराजच्या कुटुंबाने प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. सेवा रस्त्यावर ना रिफ्लेक्टर होते, ना ड्रेनेज झाकण्यात आले होते, असा आरोप वडिलांनी केला आहे. दाट धुक्यात हीच निष्काळजीपणा अपघाताला कारणीभूत ठरल्याचे त्यांनी सांगितले. नॉलेज पार्क पोलीस ठाण्याचे प्रभारी सरवेश कुमार यांनी प्रकरणात कुठलीही दुर्लक्ष आढळल्यास चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
या मृत्यूनंतर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले. संतप्त रहिवाशांनी घोषणाबाजी करत प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार सेवा रस्त्यावर रिफ्लेक्टर आणि सूचना फलक लावण्याची मागणी त्यांनी अनेक वेळा केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले.
घटनेनंतर काही वेळातच संबंधित खोल खड्डा कचरा आणि मलब्याने भरून टाकण्यात आला. मात्र एका तरुणाचा जीव गेल्यानंतर उचललेले हे पाऊल नागरिकांचा संताप आणखी वाढला आहे.
