काळरात्रीचे साक्षीदार
ही घटना आहे आजपासून बरोबर 9 वर्षांपूर्वीची म्हणजे २० नोव्हेंबर २०१६ च्या पहाटेची. मध्य प्रदेशातील इंदूरहून बिहारमधील पाटणाकडे जाणारी १९३२१ इंदूर-पाटणा एक्सप्रेस 106 च्या स्पीडने पळत होती. रात्रीचे साधारण ३ वाजले होते. थंडीचे दिवस असल्याने बाहेरच्या खिडक्यांमधून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे बहुतेक प्रवासी आपले ब्लँकेट किंवा चादर पूर्णपणे डोक्यापर्यंत ओढून शांत झोपले होते. झांसी-कानपूर मार्गावरील मलासा आणि पुखराया स्टेशनच्या दरम्यान ट्रेन ताशी १०६ किलोमीटर वेगाने धावत होती. सगळे काही शांत असताना, अचानक ट्रेनला इतका प्रचंड आणि भयानक धक्का बसला की, गाढ झोपेत असलेले अनेक प्रवासी हवेत उडून थेट कोचच्या छताला आदळून खाली कोसळले. या एका क्षणात सर्वत्र हाहाकार माजला आणि शांततेची जागा वेदना आणि किंकाळण्याने घेतली.
advertisement
अपघात कसा झाला नेमकं कारण काय?
न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, एस-१ स्लीपर कोचचं एका बाजूचं वेल्डिंग तुटल्याने हा भीषण अपघात झाला. गंज लागल्यामुळे कमकुवत झालेला हा भाग तुटून थेट रुळावर घासला गेला आणि पडला. यामुळे रुळावर अडथळा निर्माण झाला आणि ट्रेनच्या एस-१ आणि एस-२ या दोन बोगी डिरेल झाल्या. त्या क्षणी त्या रुळांवरून खाली उतरलेल्या बोगी फुटबॉलप्रमाणे घरंगळत गेल्या आणि तिसरी बी-३ बोगीवर जाऊन आदळल्या. याचाच अर्थ ट्रेनला इतका मोठा आणि अनपेक्षित झटका बसला की, लोको पायलटला काही कळण्याआधीच ट्रेनचे तब्बल १४ डबे रुळावरून घसरले होते. तात्काळ आपत्कालीन ब्रेक लावण्यात आला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या अपघातात १५० हून अधिक प्रवाशांनी आपला जीव गमावला होता, तर शेकडो प्रवासी गंभीर जखमी झाले होते.
कोचचा चुराडा, प्रवाशांना काढणं सर्वात मोठं आव्हान
अपघातानंतर झालेल्या बचाव कार्यात एक गोष्ट समोर आली. एस-१ आणि एस-२ या डब्यांमध्येच सर्वात जास्त मृत्यू झाले होते. कारण रात्रीच्या वेळी बहुतेक प्रवासी गाढ झोपेत असतानाच हा अपघात झाला आणि त्यांना सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अपघातानंतर लगेचच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र डब्यांची अवस्था खूपच वाईट होती. प्रवाशांना बाहेर काढणं अत्यंत जिकरीचं काम होतं. त्यानंतर एनडीआरएफ, डॉक्टर आणि स्थानिक पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.
मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आणि ढिगारा हटवण्यासाठी जड मशीनरीचा वापर करण्यात आला. दुर्दैवाने, या ट्रेनमधून दिवाळी आणि छट पूजा संपवून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारचे अनेक लोक आपापल्या कामावर परत जात होते, आणि त्यांच्या घरी परतण्याच्या वाटेतच नियतीने त्यांचा घात केला. रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्या २०२० मध्ये जाहीर झालेल्या अंतिम अहवालातून या दुर्घटनेचे मूळ कारण स्पष्ट झाले.
तांत्रिक कारणामुळे झाला होता अपघात
हा अपघात 'मेकॅनिकल फेल्युअर' म्हणजे यांत्रिक बिघाडामुळे झाला होता. एस-१ कोचच्या वेल्डिंगमध्ये आधीच जुन्या भेगा आणि गंज असल्यामुळे ती तुटून रुळात अडकली. अहवालात रुळ तुटल्याची शक्यता फेटाळण्यात आली, कारण या अपघाताच्या अगदी थोड्याच वेळ आधी चार गाड्या त्या रुळांवरून सुखरूप गेल्या होत्या. हा यांत्रिक बिघाड म्हणजे मानवी चूक नसली तरी, देखभालीत झालेल्या दुर्लक्षामुळे हा भीषण अपघात झाला, हे दुर्दैवी सत्य नकारता येणार आहे. हा दिवस आल्यानंतर ती भयंकर पहाट आठवल्याशिवाय राहात नाही, बेचैन करते.
यासारख्या भीषण अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भारतीय रेल्वेने आता ‘कवच’ या स्वदेशी अँटी-कॉलिजन सिस्टीमची अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे. ही स्वयंचलित ब्रेकिंग सिस्टीम रेल्वेला आपोआप थांबवते, ज्यामुळे दोन गाड्यांची टक्कर होणे, सिग्नल ओलांडणे किंवा वेगात असताना धोका झाल्यास ट्रेन आपोआप थांबते. सध्या १०,००० किलोमीटरहून अधिक मार्गांवर ‘कवच’ प्रणाली कार्यरत झाली आहे आणि २०२५-३० पर्यंत संपूर्ण रेल्वे नेटवर्क या प्रणालीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे.
