केरळमधील कोझिकोड शहरात एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. ढलानावर उभा असलेला ट्रक अचानक मागे आला आणि स्कूटीसह एका महिलेला चिरडत मागे गेला. फक्त काही सेंकदांमुळे महिलेचा जीव वाचला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना कोझिकोडमधील मुंडिक्कलथाजम-पेरिंगोलम रोडवरील सीडब्ल्यूआरडीएम परिसरात घडली.
advertisement
ट्रक पेरिंगोलम येथून सामान घेऊन येत होता आणि एका उतारावर थांबला होता. दरम्यान, एका स्कूटीस्वार महिला ट्रकच्या मागे येऊन उभी राहिली. काही क्षणातच ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि ट्रक उतारावरुन मागे जायला लागला. व्हिडिओत दिसते की, महिला ट्रकच्या मागे थांबून त्याच्या पुढे जाण्याची वाट पाहत होती. मात्र ट्रक अचानक मागे सरकू लागला. महिला स्कूटी मागे घेण्याचा प्रयत्न करते, पण काही कळायच्या आत ट्रकची जोरदार धडक बसते आणि ती रस्त्याच्या बाजूला फेकली जाते.
सुदैवाने, ती ट्रकच्या चाकांखाली आली नाही आणि तिचा जीव वाचला. मात्र स्कूटर पूर्णतः चिरडली गेली. ट्रक पुढे जाऊन एका झाडावर आदळून थांबला. या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली नाही, हे खरोखरच भाग्याचे म्हणावे लागेल. तिच्या सतर्कतेमुळे आणि झपाट्याने घेतलेल्या निर्णयामुळे एक मोठा जीवितहानीचा प्रसंग टळला. अपघातानंतर आजूबाजूचे लोक धावून आले आणि महिलेला मदत केली.
स्थानिक पोलीस आणि वाहतूक विभागाने घटनेचा तपास सुरू केला आहे. ट्रकचे ब्रेक का फेल झाले, चालकाची जबाबदारी, तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन यासंदर्भात चौकशी सुरू आहे. केरळमधील ही घटना वाहनचालकांसाठी एक धडा आहे. ब्रेक्सची वेळोवेळी तपासणी, वाहने उतारावर उभी करताना सुरक्षित अंतर राखणे आणि ट्रकसारख्या जड वाहनांमध्ये डबल ब्रेक आणि हँडब्रेकची योग्य अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे.