आया बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवला,भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन सिंदूर' नेमकं काय आहे?
भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील ९ अतिरेकी शिबिरांवर क्षेपणास्त्र डागले. हे क्षेपणास्त्र डागताना भारतीय वायुदलाने LOC सीमा न ओलांडता भारतीय हवाई क्षेत्रातूनच लक्ष्यभेद केला आहे. याद्वारे भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.
काश्मीरच्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक पहलगाम येथे गेले होते. या निशस्त्र पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. तुमचा धर्म कोणता, असे विचारून हिंदू मुसलमान नागरिकांना वेगळे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यादरम्यान त्यांनी काही जणांना कुराणातील 'आयत' म्हणायली लावली. ज्यांना म्हणता आली नाही, त्यांना त्याक्षणी गोळ्या मारण्यात आल्या. या हल्ल्यात जवळपास २७ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला.
advertisement
पहलगाममधील दहशतवाद्यांनी बैसरन पहलगाममध्ये हल्ला केला तेव्हा त्यांनी कोणत्याही महिलेची हत्या केली नाही. खरे तर, दहशतवाद्यांना केवळ पुरुषांना लक्ष्य करून त्यांनाच मारण्याचा प्लॅन होता. म्हणूनच भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. आपल्या आई बहिणींचे कुंकू पुसणाऱ्यांना भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे चांगलाच धडा शिकवला आहे.
आम्ही फक्त दहशतवादाविरोधात, भारताचा जगाला संदेश
भारताची ही कारवाई खूपच धोरणात्मक आहे. भारताने कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला अजिबात लक्ष्य केलेले नाही. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्रे डागून भारताने आपण केवळ दहशतवादाविरुद्ध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.