नवी दिल्ली: बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन यांना भारतीय जनता पार्टीत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपाने त्यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून वयाच्या 45 व्या वर्षी ही जबाबदारी मिळाल्यामुळे ते पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरले आहेत. पटना येथील बांकीपूर मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेले नितीन नवीन हे सध्या नितीश कुमार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री आहेत. त्यांचा जन्म पटना येथे झाला असून ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नवीन किशोर प्रसाद सिन्हा यांचे पुत्र आहेत.
advertisement
यंदाच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रानुसार नितीन नवीन यांच्या पत्नीचे नाव दीपमाला श्रीवास्तव असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. वडिलांच्या निधनानंतर नितीन नवीन यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 2006 च्या पोटनिवडणुकीत पहिला विजय मिळवल्यानंतर ते 2010, 2015, 2020 आणि 2025 या सर्व विधानसभा निवडणुकांत सलग विजयी झाले आहेत. 2025 च्या निवडणुकीत त्यांनी 98,299 मते मिळवत आरजेडीच्या उमेदवार रेखा कुमारी यांचा 51,936 मतांच्या फरकाने पराभव केला होता.
शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत नितीन नवीन बारावी उत्तीर्ण आहेत. त्यांनी 1996 मध्ये सेंट मायकेल हायस्कूलमधून दहावी आणि 1998 मध्ये नवी दिल्लीतील सीएसकेएम पब्लिक स्कूलमधून बारावी पूर्ण केली. आधुनिक राजकारणी म्हणून ते डिजिटल माध्यमांवरही सक्रिय असून ई-मेल, मोबाईल, व्हॉट्सअॅपसह फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि यूट्यूबसारख्या सर्व प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतदार आणि पक्षकार्यकर्त्यांशी सतत संपर्कात असतात.
शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार, नितीन नवीन यांची स्वतःची चल संपत्ती सुमारे 99 लाख 71 हजार रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीची चल संपत्ती सुमारे 66 लाख 52 हजार रुपये आहे. नितीन नवीन यांच्या नावावर कोणतीही अचल संपत्ती नसली, तरी त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे 1.47 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे.
नितीन नवीन यांच्या विविध बँक खात्यांमध्ये आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये सुमारे 42.60 लाख रुपये जमा असून त्यांच्याकडे स्कॉर्पिओ आणि इनोव्हा क्रिस्टा अशी दोन वाहने आहेत. त्यांच्या पत्नीच्या नावावर बँक ठेवी (पीपीएफसह) सुमारे 54.30 लाख रुपये असून शेअर्स आणि म्युच्युअल फंडात सुमारे 6.44 लाख रुपयांची गुंतवणूक आहे.
दागिन्यांच्या बाबतीत त्यांच्या पत्नींकडे सुमारे 70 ग्रॅम सोने आणि 400 ग्रॅम चांदीचे दागिने आहेत. तर नितीन नवीन यांच्याकडे सुमारे 1.40 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. अचल संपत्तीत फतुहा येथील दरियापूर भागात सुमारे 28.97 लाख रुपये किमतीची शेती जमीन आणि पटना येथील एसके नगरमध्ये सुमारे 1.18 कोटी रुपये किमतीचे घर त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे. या घराचे बांधकाम वारशाने मिळालेल्या जमिनीवर करण्यात आले आहे.
नितीन नवीन यांच्यावर सध्या एकूण 56.66 लाख रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये ICICI बँकेकडून घेतलेले संयुक्त गृहकर्ज तसेच बिहार विधानसभा मार्फत मिळालेले इनोव्हा क्रिस्टा वाहन कर्ज समाविष्ट आहे. आयकर विवरणपत्रानुसार गेल्या पाच वर्षांत नितीन नवीन यांचे वार्षिक उत्पन्न 3.35 लाख ते 3.71 लाख रुपयांच्या दरम्यान राहिले आहे. तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न 1.12 लाखांपासून 14.69 लाख रुपयांपर्यंत (2021-22 या आर्थिक वर्षात) गेले आहे.
नितीन नवीन यांनी कोणत्याही प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले नसल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. मात्र त्यांच्या विरोधात पाच प्रकरणे विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. ही प्रकरणे प्रामुख्याने राजकीय आंदोलन आणि निदर्शनांदरम्यान दाखल झालेली असून त्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 147, 188, 353 आणि 341 अंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे.
