विंग कमांडर शिवांगी सिंग, भारताच्या एकमेव महिला राफेल पायलट, बुधवारी एका ऐतिहासिक क्षणाचा भाग ठरल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फ्रेंच बनावटीच्या राफेल लढाऊ विमानातून ऐतिहासिक उड्डाण (sortie) घेतले आणि हे उड्डाण अंबाला वायुदल तळावरून झाले. जे भारताच्या प्रगत लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचे आणि प्रतिष्ठित “गोल्डन अॅरो स्क्वाड्रन”चे मुख्य ठिकाण आहे.
advertisement
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन लढाऊ विमानांत प्रवास करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रप्रमुख ठरल्या आहेत. 2023 मध्ये त्यांनी सुखोई-30 एमकेआय मध्ये उड्डाण केले होते आणि आता राफेलमध्ये. त्यांनी या अनुभवाचे वर्णन “अविस्मरणीय” असे करताना सांगितले की, या उड्डाणामुळे भारताच्या संरक्षण क्षमतेबद्दलचा त्यांचा अभिमान अधिक दृढ झाला आहे. हे उड्डाण सुमारे 30 मिनिटांचे होते, ज्यामध्ये ग्रुप कॅप्टन अमित गेहानी, 17 स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर, पायलट होते. या उड्डाणात विमानाने जवळपास 200 किमी अंतर 15,000 फूट उंचीवर आणि सुमारे 700 किमी प्रतितास वेगाने पार केले.
उड्डाणानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी स्थानकाच्या व्हिजिटर बुकमध्ये लिहिले, राफेल विमानातील हे उड्डाण माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. या शक्तिशाली राफेल विमानातील माझ्या पहिल्या उड्डाणाने राष्ट्राच्या संरक्षण क्षमतेबद्दल माझा अभिमान अधिक वाढवला आहे.
शिवांगी सिंग कोण आहेत?
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील शिवांगी सिंग यांना विमानचालनाची आवड लहानपणी नवी दिल्लीतील एअर फोर्स म्युझियमला भेट दिल्यानंतर निर्माण झाली. त्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या (BHU) पदवीधर असून त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील भारतीय वायुसेना अकादमीमध्ये (AFA) प्रवेश घेतला आणि तेथे कठोर प्रशिक्षण घेत लढाऊ पायलट बनल्या.
2017 मध्ये त्या भारतीय वायुसेनेत दुसऱ्या तुकडीतील महिला लढाऊ वैमानिक म्हणून सामील झाल्या. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी मिग-21 बायसन हे अत्यंत आव्हानात्मक विमान उडवून केली. जे भारतीय वायुसेनेतील सर्वात कठीण विमानांपैकी एक मानले जाते.
2020 मध्ये शिवांगी सिंग यांची राफेल विमानाच्या रूपांतरण प्रशिक्षणासाठी निवड झाली. या प्रशिक्षणात अत्याधुनिक सिम्युलेटर सत्रे आणि फ्रेंच तज्ज्ञांकडून प्रगत टॅक्टिकल शिक्षण यांचा समावेश होता. त्यांच्या प्रशिक्षणाचा केंद्रबिंदू राफेलच्या अत्याधुनिक प्रणालींवर प्रभुत्व मिळवणे हा होता. ज्यामध्ये थॅल्स RBE2 AESA रडार आणि अचूक हल्ला करण्याची क्षमता यांचा समावेश आहे, जे राफेलला 4.5 पिढीच्या (generation) लढाऊ विमानांमध्ये अग्रगण्य बनवतात.
शिवांगी सिंग यांनी 2023 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या एक्सरसाइज ओरियन 2023 या आंतरराष्ट्रीय सराव मोहिमेत भारताचे प्रतिनिधित्व केले, जिथे भारतीय वायुसेनेने जगातील प्रमुख हवाई दलांसोबत भाग घेतला होता.
