पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी सांगितले की, पवना नदीचे सुमारे 24.40 किलोमीटर अंतर पिंपरी-चिंचवड शहरातून वाहते. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्ती असून सांडपाणी वाहिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी वाहिन्यांमधून गळती होत आहे. काही ठिकाणी झाकणांवरून सांडपाणी ओसंडून थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढून पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे.
advertisement
सुशोभीकरण नव्हे, स्वच्छतेकडे लक्ष द्या
सारंग यादवाडकर यांनी सांगितलं की, स्थानिक प्रशासन आणि औद्योगिक वसाहतींकडून या नद्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. नदीचं पाणी इतकं दूषित झालं आहे की त्यामध्ये मासेसुद्धा जिवंत राहू शकत नाहीत. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या औद्योगिक वसाहती, अतिक्रमण आणि सांडपाण्याचा अनियंत्रित विसर्ग यामुळे नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. तसेच त्यांनी स्थानिक प्रशासनाला विनंती केली आहे की, नदीच्या सुशोभीकरणाकडे लक्ष देण्यापेक्षा नदी स्वच्छ राहील याकडे अधिक लक्ष द्यावं. नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी आणि तिचं आरोग्य टिकवण्यासाठी तातडीने उपयोजना करण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.





