एका दगडात दोन पक्षी मारण्याचा नेमका प्लॅन काय होता?
आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, सोनमचा प्रियकर राज हा सोनमचे वडील देवी सिंग यांच्या प्लायवूडच्या फॅक्टरीमध्ये काम करत होता. या काळात सोनम अनेकदा आपल्या वडिलांच्या फॅक्टरीत येऊन बसायची. याच काळात सोनमची राज कुशवाहशी ओळख झाली. यातून दोघांमध्ये प्रेम फुललं. दोघंही मागील चार ते पाच महिन्यांपासून प्रेमसंबंधात होते. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं.
advertisement
पण वडील प्रेम विवाहाला मान्यता देणार नाहीत, असं सोनमला वाटायचं. वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न केलं, तर त्यांचा जीव जाईल, अशी भीती सोनमला होती. कारण सोनमच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होता. अशात सोनमने राजसोबत पळून जाऊन लग्न केलं, तर वडिलांना त्रास होईल आणि यात त्यांचा जीवही जाण्याचा धोका होता.
अशातच सोनमने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्लॅन केला. म्हणजेच प्रियकर राजसोबत लग्नही होईल आणि वडिलांचा जीवही वाचेल, असा तोडगा तिला हवा होता. यातूनच तिने राजा रघुवंशीसोबत लग्न करायचं आणि त्यानंतर त्याची हत्या करायची. यामुळे विधवा बनून वडील राजसोबत लग्न लावतील. आणि प्रेम विवाह केला म्हणून वडिलांच्या जीवालाही धोका निर्माण होणार नाही, असा प्लॅन सोनमचा होता.
यातूनच तिने प्रियकर राजशी मिळून वेगळाच प्लॅन आखला. राजाशी लग्न झाल्यानंतर काहीतरी बहाणा करून त्याची हत्या घडवून आणायची. राजाची हत्या झाल्यास सोनम विधवा बनेन. यानंतर सोनमचे वडील आपल्या विधवा मुलीचं राजशी लग्न लावून द्यायला तयार होतील, असा हा प्लॅन होता. त्यानुसार दोघांनी नियोजित कट रचून राजाची हत्याही केली. पण त्यांचं बिंग फुटलं. पोलिसांनी सोनमसह तिचा प्रियकर राजा आणि इतर तीन जणांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.