नेमकं प्रकरण काय?
वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भाजपकडून शिल्पा केळुसकर या रिंगणात आहेत, तर शिंदे यांच्या शिवसेनेकडून पूजा कांबळे या निवडणूक लढवत आहेत. वास्तविक, महायुतीमध्ये हा वॉर्ड शिंदे गटाला सोडण्यात आला होता. मात्र, शिल्पा केळुसकर यांनी भाजपच्या 'एबी' फॉर्मची कलर झेरॉक्स प्रत वापरून आपला अर्ज दाखल केला. हा अर्ज निवडणूक आयोगाने वैध ठरवला आहे. परिणामी, येथे अधिकृतपणे 'कमळ' विरुद्ध 'धनुष्यबाण' असा सामना रंगला आहे.
advertisement
भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी...
भाजप कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा प्रचारादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिल्पा केळुसकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना शिंदे गटावर बोचरी टीका केली. विशेष म्हणजे, ज्या घोषणांमुळे आजवर उद्धव ठाकरे गट शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न करत होता, त्याच "५० खोके, एकदम ओके" अशा घोषणा आता भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले हे दोन्ही पक्ष मुंबईतील या वॉर्डमध्ये मात्र एकमेकांसमोर उभे ठाकल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भाजप नेत्यांनी शिल्पा केळुसकर यांच्या उमेदवारीपासून अंतर राखले असले, तरी स्थानिक पातळीवर भाजपचे कार्यकर्ते मात्र त्यांच्याच प्रचारात सक्रिय आहेत. या वादामुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
