बलूचिस्तानच्या दुर्गम डोंगराळ प्रदेशात हायजॅक झालेल्या प्रवासी ट्रेनला वाचवण्यासाठी मोठे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सिबी आणि क्वेटा येथील रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली असून, घटनास्थळी रुग्णवाहिका आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
दुर्गम भागामुळे बचाव कार्यात अडथळे
बलूचिस्तान सरकारच्या निवेदनानुसार, रेल्वे विभागाने बचाव कार्यासाठी अधिक गाड्या घटनास्थळी पाठवल्या आहेत. मात्र, घटनास्थळाचा भूभाग अत्यंत खडतर असल्यामुळे आणि डोंगराळ भागात असल्यामुळे सुरक्षा दलांना तिथे पोहोचण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. या हल्ल्याचा अभ्यास केला जात आहे आणि यात दहशतवादी गट सहभागी आहेत का, याचा तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बलूचिस्तान सरकारने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत आणि तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
advertisement
पाकमध्ये दहशतवादी हल्ला, प्रवासी ट्रेन हायजॅक; १०० हून अधिक प्रवाशांना ओलीस
रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर
हेल्थ डिपार्टमेंटचे प्रवक्ते डॉ. वसीम बैग यांनी सांगितले की, सिव्हिल हॉस्पिटल क्वेटामध्ये तातडीची परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, सर्व डॉक्टर, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
गोंधळ रोखण्यासाठी सरकारचा इशारा
सरकारी प्रवक्त्याने जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि परिस्थितीबाबत अधिकृत निवेदनांचीच वाट पहा, असे आवाहन करण्यात आले आहे.घटनास्थळी तणाव कायम असून, बचाव पथके घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान रेल्वे आणि सुरक्षादलांकडून कोणत्याही क्षणी अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
