मृत्यूच्या दिवशी हर्षलने आपल्या आईला, ज्योती भावसार यांना जेवण करण्यासाठी चिकन दिलं आणि तो बाहेर पडला. त्यानंतर तो परत घरी आलाच नाही, ज्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. पोलिसांनी पंचनामा केला, पण हर्षलच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा तीव्र संशय व्यक्त केला.
advertisement
कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. आणि मग जो भयानक ट्विस्ट समोर आला, त्याने सगळ्यांना हादरवलं. हा अपघात नसून क्रूरपणे केलेला खून असल्याचे पोलीस तपासात सिद्ध झालं. हर्षलचा मृत्यू एका अगदी क्षुल्लक वादातून झाला होता. हॉटेलमध्ये जेवण करत असताना 'चोर पऱ्या' या शब्दावरून हर्षलचा वाद झाला. भूषण महाजन, लोकेश महाजन आणि परेश महाजन या तिघांसोबत हा वाद इतका वाढला की, तिघांनी त्याला हॉटेलमध्येच मारहाण केली. पण बदला घेण्याची त्यांची भूक तिथे थांबली नाही.
तिघांनी पुन्हा हर्षलला पकडले, त्याला दुचाकीवरून ओढत शेतात नेले. तिथे पुन्हा त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर क्रूरतेची सीमा ओलांडत तिघांनी गंभीर जखमी झालेल्या हर्षलला थेट रेल्वे रुळावर फेकून दिले आणि तिथून पळ काढला. यानंतर रेल्वेखाली येऊन हर्षलचा जीव गेला.
दरम्यान, हर्षलच्या आई, ज्योती भावसार यांच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात भूषण महाजन, लोकेश महाजन आणि परेश महाजन या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत भूषण महाजनला अटक केली आहे, तर त्याचे अन्य दोन साथीदार अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
