खात्रीशीर अन् लोकप्रिय होती 'ही' सेवा
टपाल विभागाच्या काही लोकप्रिय सेवांमध्ये 'रजिस्टर्ड टपाल' सेवेचा समावेश होता. काळाच्या ओघात आंतरदेशीय पत्रे, साधे पोस्टकार्ड यांसारख्या सेवा बंद पडल्या किंवा त्यांचा वापर अत्यंत कमी झाला. मात्र, 'रजिस्टर्ड टपाल' सेवा आजही लोकप्रियता टिकवून आहे. या सेवेत टपाल पाठवताना त्याची पोहोच जागेवर (एडी स्लिप) मिळते, शिवाय टपाल पोहोचल्यानंतर ते घेणाऱ्याच्या सहीमुळे पुन्हा एकदा पोहोच मिळते. त्यामुळे 'रजिस्टर्ड टपाल' सेवा अत्यंत खात्रीशीर मानली जाते. विशेषतः शासकीय कार्यालयातून खूप मोठ्या प्रमाणात या सेवेचा वापर होतो.
advertisement
इतिहास अन् सद्यस्थिती
ब्रिटिश काळापासून, म्हणजे सुमारे 171 वर्षांपासून ही सेवा सुरू होती. ती आता जनसामान्याला निरोप देईल. याचे कोणतेही स्पष्ट कारण टपाल खात्याने दिलेले नाही. मात्र, या सेवेला स्पीड पोस्टचा पर्याय सुचवला आहे.
पूर्वी 20 ग्रॅम वजनाच्या रजिस्टर्ड टपालासाठी 26 रुपये मोजावे लागत होते. आता याच वजनाच्या स्पीड पोस्टसाठी 15 रुपये अतिरिक्त म्हणजे 41 रुपये द्यावे लागणार आहेत. स्पीड पोस्ट सेवेत 31 किलो वजनापर्यंत पार्सल पाठविण्याची सोय आहे. टपाल पोहोचल्यानंतर मिळणारी पोहोच, जी रजिस्टर्ड टपालाची मुख्य सुविधा होती, ती आता स्पीड पोस्टलाही दिली जाईल.
30 ऑगस्टपासून निरोप घेणार
टपाल विभागाच्या काही लोकप्रिय आणि अधिक कार्यक्षम सेवेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे टपाल खात्याने म्हटले आहे. स्पीड पोस्टद्वारे ग्राहकांना कमीत कमी वेळेत पार्सल पोहोचवणार आहे आणि टपाल कोठे पोहोचले याचे ट्रॅकिंगही (Tracking) करता येणार आहे. 'रजिस्टर्ड टपाल' सेवा 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, 31 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने, ही सेवा प्रत्यक्षात 30 ऑगस्टपासून निरोप घेईल.
हे ही वाचा : Mumbai Weather : मुंबईत पावसाची विश्रांती, आता पुन्हा नवसंकट, हवामान खात्याकडून अलर्ट
हे ही वाचा : कोल्हापूरची चिंता मिटली! 17 धरणे तुडुंब भरली; उन्हाळ्यात पाण्याची समस्या सुटली; पण धाकधूक कायम!