कोल्हापूरची चिंता मिटली! 17 धरणे तुडुंब भरली; उन्हाळ्यात पाण्याची समस्या सुटली; पण धाकधूक कायम!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
गेल्या अडीच महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू असल्याने 17 धरणे पूर्णपणे भरली आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमी असला तरी, त्याच्या सातत्यामुळे...
कोल्हापूर : मागील अडीच महिन्यांपासून जिल्ह्यात अखंडितपणे पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी असला, तरी तो सातत्याने राहिल्याने जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. जिल्ह्यातील 17 धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने कोल्हापूरकरांची उन्हाळ्यातील पाण्याच्या कमतरतेची चिंता मिटली आहे.
जिल्ह्याची जीवनरेखा : प्रमुख धरणे
- कोल्हापूर जिल्ह्यात छोटी-मोठी 17 धरणे आहेत.
- सर्वाधिक 34 टीएमसी (हजार दशलक्ष घनफूट) क्षमतेचे वारणा धरण आहे. जरी हे धरण सांगली जिल्ह्यात येत असले, तरी त्याचा थेट परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांवर होतो.
- त्यापाठोपाठ 25 टीएमसी क्षमतेचे दूधगंगा धरण आहे.
- राधानगरी धरण हे 8 टीएमसीचे आहे, तरी कोल्हापूर शहरासह करवीर, राधानगरीसह काही तालुक्यांसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे.
advertisement
त्यामुळे, ही तिन्ही धरणे कधी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागतात, याकडे कोल्हापूरकरांच्या नजरा लागलेल्या असतात.
पावसाची दमदार सुरुवात आणि पाणीसाठा
यंदा, मे महिन्यातच दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने सुरुवात केली. मध्यंतरीचा काही कालावधी वगळता एकसारखा पाऊस सुरू आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील बहुतेक धरणे भरली आहेत. सध्या जिल्ह्यातील 17 धरणांमध्ये 93.66 टीएमसी पाणीसाठा आहे. वर्षभर त्याचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास जूनपर्यंत पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मुबलक मिळेल.
advertisement
पुढील दोन महिने अजूनही धाकधूक कायम
सुरुवातीच्या दोन महिन्यांतच धरणे तुडुंब भरली आहेत. अजून निम्मा पावसाळा बाकी आहे. या कालावधीतही जोरदार पाऊस होईल, असा अंदाज असल्याने हे दोन महिने कोल्हापूरकरांसाठी धाकधूक वाढवणारे ठरू शकतात, कारण अतिवृष्टीचा धोका कायम असतो. विशेष म्हणजे, मागील 30 वर्षे राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे स्वप्न असलेल्या राई (ता. राधानगरी) येथील धामणी प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठले आहे. हे पाणीही यंदा अतिरिक्त म्हणून शेतकऱ्यांसह पिण्यासाठी वापरण्यास मिळणार आहे, ज्यामुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात यंदा सलग पाऊस असला तरी अतिवृष्टीसारखा कोसळलेला नाही. त्यामुळे धरणक्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाऊस कमीच राहिला आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2025 6:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरची चिंता मिटली! 17 धरणे तुडुंब भरली; उन्हाळ्यात पाण्याची समस्या सुटली; पण धाकधूक कायम!