Cattle Care: शेतकरी दादा! पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला धोका, अशी घ्या काळजी!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Cattle Care: पावसाळ्यामध्ये गाई, म्हशी आणि शेळ्यांसारखे पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनेक अडचणी येतात.
छत्रपती संभाजीनगर: सध्या पावसाळा हा ऋतू सुरू आहे. या ऋतूमध्ये पावसाचे पाणी, हवेतील ओलावा आणि आर्द्रता यांमुळे अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यामध्ये गाई, म्हशी आणि शेळ्यांसारखे पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनेक अडचणी येतात. कारण, पावसाळ्यात जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागते. नाहीतर त्यांना देखील अनेक आजार होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या पशुधनाची कशी काळजी घ्यावी? त्यांचा आहार कसा असावा? कोणते लसीकरण करून घ्यावे? याबाबत माहिती असणे, आवश्यक आहे. लोकल 18ने तज्ज्ञांकडून याबाबत सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. जे. तळेकर म्हणाले, "पावसाळ्यामध्ये आपण आपल्या पशुधनाची काळजी घेणं फार गरजेचं असतं. पावसाळ्यामध्ये सततच्या ओलाव्यामुळे मोठ्या प्रमाणात माशा आणि चिलटांसाखरे कीटक फिरतात. हे कीटक जनावरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. कीटकांमुळे जनावरांना विविध आजार होण्याची शक्यता असते."
advertisement
डॉ. तळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात आपल्या गोठ्यातील जनावरे निरोगी रहावीत यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जनावरांचा गोठा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यासाठी निर्जंतुकीकरणाची औषधे वापरली पाहिजेत. जनावरांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आंघोळ घातली पाहिजे. जेणेकरून त्यांच्या अंगावर गोचिड, माशा, चिलटांसारखे कीटक वास्तव्य करणार नाहीत. याशिवाय पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. माणसाप्रमाणे जनावरांसाठी देखील वेगवेगळ्या लसी असतात. विशेषत: पावसाळ्यात लंपी या आजारासाठी लसीकरण करून घेणे फार गरजेचं आहे.
advertisement
स्वच्छतेसोबतच पशुधनाचा आहार देखील फार महत्त्वाचा आहे. दुभती जनावरे, कष्टाची कामे करणारे बैल आणि गोठ्यातील इतर जनावरांना पावसाळ्यात हिरवा चारा, कोरडा चारा किंवा बाजारात मिळणारे पशुखाद्य असा सकस आहार दिला पाहिजे. जर एखाद्या जनावरामध्ये बदल होत असल्याचं निदर्शनास आल्यास तत्काळ पशुवैद्यकाची मदत घेतली पाहिजे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Aug 03, 2025 10:08 PM IST







