आदरणीय संत आणि समाजसुधारक संत गुरू रविदास जी यांच्या 649व्या जयंतीचे पवित्र औचित्य साधून त्यांच्या सन्मानार्थ आदमपूर विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यांनी दिलेली समानता, करुणा आणि मानवी प्रतिष्ठेची शिकवण भारताच्या सामाजिक मूल्यांना आजही प्रेरणा देत आहे.
पंजाबमधल्या विमान वाहतूक पायाभूत सुविधांना आणखी चालना दिली जात असून पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणारी हलवारा विमानतळाची टर्मिनल इमारत राज्यासाठी एक नवे प्रवेशद्वार ठरेल, लुधियाना आणि त्याच्या आसपासच्या औद्योगिक व कृषी क्षेत्राची गरज पूर्ण करेल. लुधियाना जिल्ह्यात असलेल्या हलवारा येथे भारतीय हवाई दलाचे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे.
advertisement
लुधियाना येथे पूर्वीच्या विमानतळावर तुलनेने लहान धावपट्टी होती, जी लहान आकाराच्या विमानांसाठी योग्य होती. कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि मोठ्या विमानांना सामावून घेण्यासाठी, हलवारा येथे एक नवीन नागरी अंतक्षेत्र विकसित करण्यात आले असून तिथे ए320-प्रकारची विमाने हाताळण्यास सक्षम असलेली लांब धावपट्टी आहे.
पंतप्रधानांच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टिकोनाशी सुसंगत, या टर्मिनलमध्ये एलईडी प्रकाशयोजना, इन्सुलेटेड छत, पर्जन्यजल संचयन प्रणाली, सांडपाणी आणि जलशुद्धीकरण प्रकल्प आणि उद्यानांसाठी पुनर्वापर जल यांसारख्या अनेक हरित आणि ऊर्जा-कार्यक्षम वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या टर्मिनलच्या वास्तुरचनेत पंजाबच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब उमटले असून प्रवाशांना एक वैशिष्ट्यपूर्ण आणि क्षेत्रीय प्रेरणा अनुभवायला मिळेल.
